'युवा' ची निर्घृण हत्या, मालकाची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:46 IST2018-08-30T21:33:48+5:302018-08-30T21:46:32+5:30

याप्रकरणी कुत्र्याला संभाळणारे श्याम धुमाळ यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

Dog named Yuva has murdered | 'युवा' ची निर्घृण हत्या, मालकाची पोलिसांत धाव

'युवा' ची निर्घृण हत्या, मालकाची पोलिसांत धाव

मुंबई - प्रतिक्षा नगर येथे चोऱ्या करताना गर्दुल्यांसाठी कायम अडथळा ठरणाऱ्या कुत्र्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी कुत्र्याला संभाळणारे श्याम धुमाळ यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. 

सायनच्या प्रतिक्षानगर परिसरात श्याम धुमाळ हे राहत असून त्यांनी 'युवा' नावाचा कुत्रा पाळला होता. 'युवा'च्या सतर्कतेमुळे परिसरातील चोर आणि गर्दुल्यांचा वावर कमी झाला होता. याच परिसरात राहणारे सुरेश आणि तंबी हे नशेच्या आहारी गेले होते. त्यामुळे खिशात नशा करण्यासाठी पैसे नसल्यास ते परिसरातील नागरिकांचे सामान चोरून विकायचे. मात्र, 'युवा'मुळे अनेकदा त्यांच्या चोरीचा डाव फसला होता. त्यामुळे दोघांचाही 'युवा'वर डोळा होता.

दरम्यान, आज दुपारी 'युवा' हा प्रतिक्षानगर येथील पंचशील नगर येथे झोपलेला असताना नशेत असलेल्या सुरेश आणि तंबीने त्याला रॉडने मारहाण करून त्याची निर्घृण हत्या केली. त्यावेळी येथील स्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावरही हे दोघे धावून गेले. 'युवा'ची निर्घुण हत्या केल्याची माहिती त्याला संभाळणाऱ्या श्याम धुमाळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Web Title: Dog named Yuva has murdered