डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:47 IST2025-10-18T11:46:45+5:302025-10-18T11:47:38+5:30
बंगळुरूमधील २८ वर्षीय डॉ. कृतिकाच्या मृत्यूच्या गूढ उकललं. तिचा नवरा डॉ. महेंद्र रेड्डीनेच तिची हत्या केली.

डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
बंगळुरूमधील २८ वर्षीय डॉ. कृतिकाच्या मृत्यूच्या गूढ उकललं. तिचा नवरा डॉ. महेंद्र रेड्डीनेच तिची हत्या केली. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. डॉ. महेंद्र रेड्डीने गॅसच्या समस्येने ग्रस्त असलेल्या त्याच्या पत्नीला एनेस्थिशियाचा ओव्हरडोस देऊन मारल्याचा आरोप आहे. कृतिकाच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी आलेल्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये हे उघड झालं. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, तिला प्रोपोफोलचा डोस देण्यात आला होता. १४ ऑक्टोबर रोजी आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली.
कृतिकाचे वडील मुनी रेड्डी यांनी त्यांच्या मुलीसाठी आणि जावयासाठी स्वप्नातलं एक सुंदर घर बांधलं होतं. लग्नानंतर मुलीने त्यांच्यासोबत एकाच घरात राहावं आणि सुखाने संसार करावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या सर्व स्वप्नांची राख झाली. मुनी रेड्डी म्हणाले, "मी माझ्या मुलीसाठी घर बांधलं होतं." इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, मुलीच्या मृत्यूने दु:खी झालेल्या वडिलांनी आता घर इस्कॉनला दान केलं. त्याची किंमत अंदाजे ३ कोटी आहे.
मृत्यूनंतर ६ महिन्यांनी कुटुंबाला समजलं सत्य
मे २०२४ मध्ये लग्न झाल्यानंतर कृतिका तिचा नवर महेंद्र रेड्डीसोबत या घरात राहायला आली. एप्रिलमध्ये कृतिकाचा मृत्यू झाला. महेंद्रने घरीच तिच्यावर उपचार केले. तिच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी, कुटुंबाला धक्कादायक सत्य समजलं. फॉरेन्सिक रिपोर्टमधून असं दिसून आलं की, कृतिकाला सर्जरीदरम्यान रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या प्रोपोफोलचा ओव्हरडोस देण्यात आला होता.
डॉक्टर नवऱ्याने घेतला स्किन स्पेशलिस्ट बायकोचा जीव
महेंद्र व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जन होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रने त्याच्या प्रोफेशनल ज्ञानाचा वापर करून कृतिकाची हत्या करण्याची तयारी केली होती. त्याने २१ एप्रिल रोजी कृतिकाला इंजेक्शन दिलं. दोन दिवसांनंतर कृतिकाने IV साइटवर वेदना होत असल्याची तक्रार केली. त्याच रात्री नंतर महेंद्रने कृतिकाला दुसरा डोस दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी कृतिकाचा मृत्यू झाला. डॉक्टर असूनही महेंद्रने सीपीआर देखील दिला नाही.
मुलीच्या मृत्यूनंतर घर केलं दान
मुनी रेड्डी म्हणाले की, "आमच्या मुलीचा असा विश्वास होता की, लग्न हे परस्पर आदर आणि प्रेमावर आधारित आहे. जीव वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्ञानानेच माझ्या मुलीचा जीव घेतला." तपासात असं दिसून आलं की, कृतिकाला गॅसची समस्या होती. पण लग्नाआधी कुटुंबाने त्याला याबद्दल काहीच सांगितलं नाही म्हणून महेंद्र नाराज होता. कृतिकाच्या वडिलांनी आता मुलीच्या मृत्यूनंतर हे घर इस्कॉनला दान केलं आहे.