पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 10:47 IST2025-10-23T10:45:35+5:302025-10-23T10:47:07+5:30
पतीने मंगळसूत्र दिलं नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं.

फोटो - nbt
मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील एका कम्युनिटी हेल्थ ऑफिसरने नर्मदा नदीत उडी मारून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे पतीने मंगळसूत्र दिलं नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश कुशवाह यांनी सांगितलं की, ४० वर्षीय अंगूरबाला लोनखेडेने नर्मदा नदीवरील १२५ फूट उंच पुलावरून उडी मारली. एसडीआरएफच्या पथकाने तिला बाहेर काढलं आणि जिल्हा रुग्णालयात नेलं, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनुसार, वादामुळे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर बरवानीजवळील कल्याणपुरा येथून छोटी कसरावड पुलावर स्कूटर घेऊन गेली होती. बरवानी येथील डॉ. सुरेखा जमरे यांनी सांगितलं की, अंगूरबाला लोनखेडे जिल्ह्यातील राजपूर ब्लॉकमधील बोर्ली येथील हेल्थकेअर वेलनेस सेंटरमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून तैनात होती.
अंगूरबालाचा पती डॉ. कृष्णा लोनखेडे (इंदूरमधील बालरोगतज्ञ) यांनी स्पष्ट केले की, ती खूप हट्टी होती आणि सोन्याचं मंगळसूत्र खरेदी करण्याचा हट्ट करत होती. काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीसाठी दागिने खरेदी केले तेव्हा मंगळसूत्र खरेदी करण्यास सांगितलं होतं. पण पतीने किंमत जास्त असल्याचं कारण देत नकार दिला. नंतर जेव्हा पतीने सोन्याचे ब्रेसलेट खरेदी केलं तेव्हा अंगूरबाला म्हणाली, "स्वतःसाठी ब्रेसलेट घेतलं पण माझ्यासाठी मंगळसूत्र घेतलं नाही."
तुमचं माझ्यावर प्रेम नाही असं म्हणत अंगूरबाला नाराज होऊन स्कूटरवरून निघून गेली. पतीने ११२ ला फोन करून तिचा पाठलाग केला, पण तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तिने नर्मदा नदीत उडी मारली होती. एसडीआरएफ टीमने तात्काळ बचावकार्य हाती घेतलं आणि तिला बाहेर काढलं. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी अंगूरबालाला मृत घोषित केलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.