भरतपूर - राजस्थानमध्ये एका डॉक्टर दाम्पत्यांची भरदिवसा रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्याता आल्याची घटना घडली आहे. भरतपूर शहरातील हरीदास बस स्टँड परिसरात हा हत्येचा थरार घडला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी सायंकाळी 4.45 वाजता घडली आहे. दुचाकीवर आलेले दोन्ही आरोपी गोळ्या झाडल्यानंतर गाडीवरुनच पसार झाले आहेत.
गाडीचा पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी डॉक्टर दाम्पत्याची गाडी गाठली. त्यानंतर, आपली दुचाकी थांबवून गाडीत बसलेल्या डॉक्टर सुधीर गुप्ता आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. या घटनेत डॉक्टर दाम्पत्य जागीच ठार झालं असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मागील भांडणाच्या रागातून बदल घेण्याच्या हेतुने हे हत्याकांड करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. एका तरुणीच्या हत्याप्रकरणात डॉक्टर दाम्पत्याचा सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
डॉक्टर दाम्पत्यावर गोळी चालवणारा आरोपी त्याच महिलेचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित डॉक्टरची पत्नी आणि आई या आरोपीच्या बहिणीच्या 2 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणात सहभागी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे, आरोपीने बदला घेण्यासाठीच हे हत्याकांड केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही.