धक्कादायक! महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून केली हत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:06 IST2025-03-31T13:05:11+5:302025-03-31T13:06:04+5:30

जालना पोलीस दलात होते कार्यरत, अज्ञातांवर केला गुन्हा दाखल

Dnyaneshwar Mhaske, who was working in the Jalna Police Force, was murdered in Deulgaon Raja, Buldhana | धक्कादायक! महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून केली हत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

धक्कादायक! महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून केली हत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

बुलढाणा - जालना जिल्ह्यातील पोलीस दलाच्या महामार्ग विभागात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर म्हस्के यांची अज्ञात आरोपीने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून देऊळगाव राजा तालुक्यात पोलिसाच्या हत्येची सात दिवसांत दुसरी घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा या प्रकरणी ४ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सूत्रांनुसार, गुढीपाडव्यानिमित्त मृतक ज्ञानेश्वर म्हस्के शनिवारी त्यांच्या मूळ गावी आले होते. काही कामानिमित्त ते गिरोलीहून देऊळगाव राजा येथे गेले, मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने वारंवार त्यांना फोन केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यानंतर सिंदखेडराजा रोडवरील आर जे इंटरनॅशनल स्कूलसमोरील वन विभागाच्या हद्दीत त्यांची कार उभी असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, पोलीस निरीक्षक संतोष महल्लेसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

याठिकाणी कारमध्येच पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. कारचे दरवाजे आतून बंद होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले. श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम तपासासाठी पाचारण करण्यात आले. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी स्थानिक ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला. 

७ दिवसांत पोलिसाच्या हत्येची दुसरी घटना

यापूर्वीही अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची २३ मार्च रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर ७ दिवसांत आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पोलिसच सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरा ४ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. लवकरच या खून प्रकरणाचा उलगडा होईल असं पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. 

Web Title: Dnyaneshwar Mhaske, who was working in the Jalna Police Force, was murdered in Deulgaon Raja, Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.