पार्टीत विघ्न! बुफेच्या रांगेत साडीच्या पदराने पेट घातला, महिलेचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:27 IST2022-02-03T14:26:11+5:302022-02-03T14:27:17+5:30
Woman dies of burns after sari catches fire : याप्रकरणी एलिसब्रिज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पार्टीत विघ्न! बुफेच्या रांगेत साडीच्या पदराने पेट घातला, महिलेचा होरपळून मृत्यू
अहमदाबाद - फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बुफेच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या साडीचा पदर पेटल्याने ती गंभीररीत्या भाजली होती. मात्र दुर्दैवाने सहा दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. गुजरातमधील अहमदाबाद शहरात २६ जानेवारीला ही घटना घडली होती. ५४ वर्षीय रश्मिका शहा यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हॉटेल फोर पॉईंट्स बाय शेरेटॉन या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. रश्मिका यांचे पती उमेश शहा यांच्या कंपनीने या हॉटेलमध्ये डिनरचे आयोजन केले होते. यावेळी आपल्या पतीसोबत उपस्थित असलेल्या रश्मिका यांच्या सिंथेटिक साडीचा पदर पेटला. त्या ६० टक्के भाजल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, साडीला आग लागून ५४ वर्षीय महिला होरपळून मृत्युमुखी पडल्याची खेदजनक घटना अहमदाबाद शहरात घडली आहे. मणिनगरमधील गंगेश्वर सोसायटीत राहणाऱ्या रश्मिका शहा यांचा सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. २६ जानेवारी रोजी एलिसब्रिज येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बुफेच्या रांगेत असताना रश्मिका यांच्या साडीने पेट घेतला होता. रश्मिका बुफे टेबलवर त्यांची प्लेट भरत होत्या, त्यावेळी त्याच्या सिंथेटिक साडीचा शेफिंग डिशच्या खाली सुरु असलेल्या आगीला स्पर्श झाला आणि साडीला आग लागली. आगीत रश्मिका ६० टक्के भाजल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल केलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे पोलीस निरीक्षक एच व्ही घेला यांनी सांगितले. याप्रकरणी एलिसब्रिज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हॉटेल संचालक मॅरियट इंटरनॅशनल ग्रुपच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न टाईम्स ऑफ इंडियाने केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
बापरे! भररस्त्यात बेवारस सूटकेसमध्ये सुरु होती हालचाल; उघडून पाहताच सगळेच झाले थक्क