दिग्दर्शक कवल शर्मावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; अभिनेत्रीची तक्रार, खार पोलिसांकडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 07:55 IST2025-11-29T07:54:26+5:302025-11-29T07:55:14+5:30
अंधेरीतील कार्यालयात त्यांनी आहुजांची ओळख लेखक अमन झा, राशिद खान आणि संदीप गणपत यांच्याशी करून दिली.

दिग्दर्शक कवल शर्मावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; अभिनेत्रीची तक्रार, खार पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई - खार पोलिसांनी दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक कवल शर्मा यांच्याविरुद्ध अभिनेत्री किरण आहुजा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ७१.५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल केला.
२०२३ मध्ये खार पश्चिम येथील एका कार्यक्रमात आहुजा आणि शर्मा यांची भेट झाली. या वेळी शर्मा यांनी चित्रपट व टीव्ही प्रकल्पात एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि एका नाटकासाठी ३ लाख गुंतवणूक मागितली. ती आहुजा यांनी नाकारली. ऑगस्ट २०२४ मध्ये शर्मा यांनी त्यांच्याशी संपर्क करून लकी बाय एक्सचेंज नावाच्या वेबसीरिज आणि बिरबला नॅशनल हिरो नावाचा चित्रपट बनविण्याचे नियोजन सांगितले. ज्यात ६० ते ७० लाख गुंतवल्यास १ कोटी परतावा मिळेल, असे सांगून त्यांनी आहुजांना गुंतवणुकीसाठी तयार केले.
अंधेरीतील कार्यालयात त्यांनी आहुजांची ओळख लेखक अमन झा, राशिद खान आणि संदीप गणपत यांच्याशी करून दिली. शर्मा यांच्या सूचनेनुसार आहुजांनी ५० लाख झा यांच्या खात्यात जमा केले आणि काही रक्कम रोख दिली. नंतरही त्यांनी वेळोवेळी तिघांच्या खात्यात रक्कम पाठवली. पुढे शूटिंगसाठी अधिक निधी लागेल असे सांगून शर्मा यांनी आहुजांकडून १४.५० लाख घेतले. मे २०२५ मध्ये आहुजांना उत्पादनाच्या कामाबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मागितले. शर्मा यांनी दिलेले दोन धनादेश बाऊन्स झाले. आहुजांनी एकूण ७१.५० लाख दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.