खेड पंचायत समिती सदस्यांच्या पतीकडे मागितली २५ लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 19:06 IST2019-05-15T19:02:52+5:302019-05-15T19:06:16+5:30
२५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावले. तसेच ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

खेड पंचायत समिती सदस्यांच्या पतीकडे मागितली २५ लाखांची खंडणी
चाकण : नाणेकरवाडी ( ता.खेड ) येथील पंचायत समिती सदस्याच्या पतीला व एका हॉटेल व्यावसायिकाला २५ लाखांची खंडणी तसेच खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवार ( दि.१४ ) दुपारी तीन ते चारच्या दरम्यान नाणेकरवाडी चाकण येथे घडली. याबाबत गणेश शांताराम जाधव (वय ३५, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कुख्यात गुंड बाळू आप्पा वाघेरे ( पिंपरी, पुणे ), रामनाथ सोनवणे ( रा. कुरुळी, ता.खेड, जि. पुणे ) आणि त्यांच्या ३ ते ४ साथीदारांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात मंगळवारी ( दि. १४ ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी गणेश जाधव यांचे दाजी रमन पवार ( रा. ताथवडे, ता. मुळशी, जि. पुणे ) यांचे ब्ल्यु वॉटर नावाचे हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान गणेश जाधव हे या हॉटेलवर असताना आरोपी बाळू वाघेरे, रामनाथ सोनवणे आणि त्याच्या ३ ते ४ साथीदारांनी या हॉटेलवर जाऊन गणेश यांना २५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावले. तसेच ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. वरील आरोपींनी फोनव्दारे आणि रस्त्यात गाडी अडवून देखील धमकावल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब डुबे तपास करत आहेत.