पतीनं रचला हत्येचा डाव! त्रिवेणी संगमावर स्नान करून पत्नीला कायमचे संपवून टाकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:27 IST2025-02-22T14:25:54+5:302025-02-22T14:27:36+5:30
१८ फेब्रुवारीला रात्री उशीरा त्याची भेट सुरेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीशी झाली. सुरेंद्रने ५०० रूपयात त्याला भाड्याने रूम दिली.

पतीनं रचला हत्येचा डाव! त्रिवेणी संगमावर स्नान करून पत्नीला कायमचे संपवून टाकलं
प्रयागराज - एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि त्यातून घडणारे गुन्हे अनेकदा ऐकलेच असतील. काही घटनांमध्ये विश्वास ठेवणेही कठीण जाते. दिल्ली महापालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने केलेला गुन्हा असाच आहे. स्वच्छता कर्मचारी अशोक वाल्मिकीचं एका महिलेसोबत अफेअर होते. ३ मुलांचा बाप असलेल्या अशोकच्या पत्नीला जेव्हा त्याच्या या लफड्याचं कळलं तेव्हा तिने या गोष्टीचा विरोध केला. पती, पत्नी अन् वो या नादात नेहमी घरात काही ना काही कारणावरून वाद होत होते.
अशोकनं ठरवलं असतं तर त्याने कुटुंबासाठी परस्त्रीसोबत संबंध तोडू शकला असता परंतु त्याने अनैतिक संबंध जपण्यासाठी स्वत:च्या पत्नीलाच मारण्याचा कट रचला. अशोकने पत्नीच्या हत्येचं प्लॅनिंग केले. पत्नीचा काटा काढायचा आणि कुणालाही संशय येणार नाही असं त्याने ठरवले. १७ फेब्रुवारीला पत्नी मिनाक्षीला घेऊन अशोक दिल्लीतून प्रयागराजला निघाला. १८ फेब्रुवारीला दोघांनी त्रिवेणी संगमावर गंगा स्नान केले. त्यावेळी अशोकने पत्नी मिनाक्षीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.
रात्र खूप झाली होती, दोघेही थकले होते. त्यामुळे प्रयागराजमध्ये थांबण्यासाठी अशोकने खोली शोधली. ठरलेल्या प्लॅननुसार तो रूमच्या शोधात होता जिथे त्याला आयडी द्यावा लागणार नाही आणि तिथे कुठलाही कॅमेरा नसावा. १८ फेब्रुवारीला रात्री उशीरा त्याची भेट सुरेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीशी झाली. सुरेंद्रने ५०० रूपयात त्याला भाड्याने रूम दिली. कुठलेही ओळखपत्र न दाखवता अशोकने रूम घेतला. रात्री खोलीत मिनाक्षी बाथरूमच्या दिशेने जात असताना अशोकने तिच्यावर चाकू हल्ला केला. बाथरूममध्ये तिच्या गळ्यावर वार करून मारून टाकले. त्यानंतर तो लॉजमधून पळून गेला. त्यानंतर घरी जाऊन मिनाक्षीची तब्येत महाकुंभ येथे बिघडली अशी बतावणी केली. मिनाक्षीचा मुलगा आईला शोधण्यासाठी महाकुंभला गेला.
दुसरीकडे लॉजवाल्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या करून पसार झाला परंतु लॉजकडे त्याचे ओळख पत्र नव्हते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला. त्याशिवाय महिलेचा फोटो प्रयागराजच्या सर्व पोलीस ठाण्यांना पाठवला. आईच्या शोधात प्रयागराजला आलेला मुलगा झूंसी इथल्या पोलीस ठाण्यात पोहचला. त्याने आई बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यातच पोलिसांनी मृत महिलेचा फोटो मुलाला दाखवला तेव्हा त्याने आईची ओळख पटवली. पोलिसांनी या महिलेचा खून झाल्याचं सांगितले. मात्र मुलाने आईची तब्येत बिघडली असल्याचा वडिलांनी सांगितल्याचे पोलिसांना कळवले. पोलिसांनी वडिलांना बोलवून घ्यायला सांगितले त्याशिवाय आईचा मृतदेह सापडला असं सांगू नको अशी सूचना केली.
पोलिसांसमोर उलगडलं रहस्य
दरम्यान, मुलाच्या सांगण्यावरून अशोक प्रयागराजला आला तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. खाकीचा धाक दाखवताच आरोपी अशोकने त्याचा गुन्हा कबुल केला. एका महिलेसोबत त्याचे अफेअर होते त्याला पत्नी मिनाक्षी विरोध करत होती. ती रोज भांडायची म्हणून तिला मारण्याचं षडयंत्र रचलं. प्रयागराजला योग्य जागा आहे म्हणून तिला दिल्लीतून इथं आणले. त्रिवेणी संगमावर स्नान केले, तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्याच रात्री लॉजमध्ये पत्नीला मारून टाकले असं आरोपीने सांगितले. मात्र मुलगा प्रयागराजला आल्याने अशोकच्या गुन्हा समोर आला.