चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 07:36 IST2025-10-28T07:35:08+5:302025-10-28T07:36:14+5:30
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ऑनलाइन ट्रेडिंग स्कीमचा पर्दाफाश केला आहे आणि तीन आरोपींना अटक केली आहे.

चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ऑनलाइन ट्रेडिंग स्कीमचा पर्दाफाश केला आहे आणि तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, हा संपूर्ण स्कॅम एका चिनी नागरिकाच्या इशाऱ्यावर चालवला जात होता, जो त्याच्या भारतीय सहकाऱ्यांना टेलिग्रामद्वारे सूचना देत होता. या गँगने आतापर्यंत लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, साहिल यादव (२५), आर्यन कुमार (२२) आणि आशिष कुमार उर्फ जॅक (३६) अशी आरोपींची नावं आहेत. साहिल आणि आर्यन हे बिहारमधील पटना येथील रहिवासी आहेत, तर आशिष बेगुसरायचा आहे. नोएडा येथे राहणारे तिन्ही आरोपी बनावट ट्रेडिंग स्कीम देऊन लोकांना फसवत असत. त्यानंतर ते त्यांना मोठ्या नफ्याचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळत असत.
रॅकेटमागे चीनमधील हँडलर
या रॅकेटमागे टॉम नावाचा चीनमधील एक हँडलर होता. हा हँडलर आरोपी आशिष कुमारच्या माध्यमातून संपूर्ण फसवणूकीचं ऑपरेशन हँडल करत असे. दिल्ली आणि नोएडा येथील पथकांना कोणाला टार्गेट करायचंय, कोणत्या खात्यांचा वापर करायचा आणि पैसे कुठे पाठवायचे हे तोच ठरवत असे. आग्नेय दिल्लीत दाखल झालेल्या एका गुन्ह्याची चौकशी सुरू झाल्यावर ही गँग उघडकीस आली.
🚨 CYBER CELL, CRIME BRANCH, DELHI BUSTS ₹47-LAKH ONLINE TRADING SCAM 🚨
— Crime Branch Delhi Police (@CrimeBranchDP) October 27, 2025
NETWORK OPERATED UNDER CHINESE KINGPIN’S COMMAND 💻
In a major breakthrough against cyber-enabled financial frauds, Cyber Cell, Crime Branch, Delhi has busted a ₹47-lakh online stock trading scam and… pic.twitter.com/MsFOsI9GOH
"आज खरेदी करा, उद्या विक्री करा, दररोज लाखो कमवा"
एका चार्टर्ड अकाउंटंटने तक्रार केली की, बनावट स्टॉक ट्रेडिंग वेबसाइटद्वारे त्याची ४७.२३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्याने सांगितलं की, त्याला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडले जात होते जिथे त्याला दररोज शेअर बाजारातील गुंतवणूक आणि आयपीओमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवले जात होते. ग्रुपमधील मेसेजमध्ये लिहिले होते, "आज खरेदी करा, उद्या विक्री करा, दररोज लाखो कमवा." या फसवणुकीला बळी पडून त्याने पैसे ट्रान्सफर केले.
लाखोंची फसवणूक
जेव्हा त्याने पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने त्याला केवळ धमकी दिली नाही तर आणखी पैशांची मागणीही केली. त्यानंतरच व्यक्तीला कळलं की तो एका मोठ्या सायबर स्कॅमला बळी पडला आहे. तपासादरम्यान, दिल्ली पोलिसांना आढळलं की, गोळा केलेल्या पैशांपैकी ३१.४५ लाख रुपये एका फर्मच्या चालू खात्यात जमा झाले होते. तेथून २३.८० लाख रुपये साहिल यादवच्या खात्यात ट्रान्सफर केले गेले.
अनेक राज्यांमध्ये पसरलंय नेटवर्क
सर्वात धक्कादायक म्हणजे, या खात्यावर नोंदवलेला मोबाईल नंबर सह-आरोपी आर्यनचा होता. पोलीस तपासात असं दिसून आलं की, आरोपींनी फसवणुकीच्या पैशाचं सहज वितरण करण्यासाठी किमान सात बँक अकाऊंट उघडले होते. या कंपन्यांविरुद्ध आधीच १३१ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. हे नेटवर्क आधीच सक्रिय होते आणि अनेक राज्यांमध्ये पसरले होते.
आरोपींनी कबूल केलं की डिसेंबर २०२४ मध्ये टेलिग्रामद्वारे एका "चिनी हँडलर" ने त्यांची भरती केली होती. जर त्यांनी त्यांच्या बँक अकाऊंटचा वापर स्कॅमसाठी करू दिला तर त्याने त्यांना प्रत्येक १ कोटी रुपयांच्या व्यवहारावर १ ते १.५ टक्के कमिशन देण्याचं आश्वासन दिले. त्याने हे पैसे वळविण्यासाठी एक बनावट फर्म तयार केली आणि त्याद्वारे पैसे ट्रान्सफार करण्यास सुरुवात केली. या नेटवर्कचा मुख्य समन्वयक आशिष होता.