दोन महिन्यांचा पाठलाग, २०० सीसीटीव्ही अन् १०० फोन; अशी अडकली दिल्लीची 'ड्रग्स क्वीन' जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 11:32 IST2026-04-11T11:28:55+5:302026-04-11T11:32:49+5:30
दिल्ली पोलिसांनी सुलतानपुरी परिसरातील कुसूम या कुख्यात महिला अंमली पदार्थ तस्कराविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.

दोन महिन्यांचा पाठलाग, २०० सीसीटीव्ही अन् १०० फोन; अशी अडकली दिल्लीची 'ड्रग्स क्वीन' जाळ्यात
Delhi Crime: दिल्लीपोलिसांपासून गेल्या कित्येक आठवड्यांपासून निसटणाऱ्या ड्रग्स क्वीन कुसूमच्या मुसक्या अखेर आवळण्यात आल्या आहेत. ९ एप्रिल रोजी शहादरा पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत तिला बेड्या ठोकल्या. तिच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस होते आणि मकोकाच्या अंतर्गत ती गेल्या दोन महिन्यांपासून फरार होती. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश अशा तीन राज्यांत पसरलेल्या या मोहिमेचा शेवट अखेर गुरुवारी झाला.
२०० कॅमेरे, १०० फोन अन् 'शून्य' चूक
कुसूमला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर मोठे होते. ती अत्यंत सावधगिरीने वागत असे. तिला शोधण्यासाठी पोलिसांनी राबवलेली मोहीम एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हती. पोलिसांनी तब्बल २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनेक तासांचे फुटेज तपासले. जवळपास १०० मोबाईल फोन रेकॉर्ड्सचे विश्लेषण करून तिचा शोध घेण्यात आला. कुसूम स्मार्टफोन वापरत नव्हती तसेच सतत सीम कार्डे बदलत होती. ती एकाच जागी बराच वेळ राहायची नाही.
अनेक वेळा पोलीस पोहोचण्याच्या काही मिनिटे आधीच ती तिथून गायब होत असे.
शहादरामध्ये रचला सापळा
गुरुवारी पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाली की कुसूम शहादरा भागात येणार आहे. यावेळी पोलिसांनी कोणतीही चूक होऊ दिली नाही. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली. पोलिसांनी झडप घालताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी तिला पकडले.
घरातूनच चालवली ड्रग्जचे जाळे
तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुसूमचे हे अमली पदार्थांचे साम्राज्य केवळ तिनेच नाही, तर तिच्या संपूर्ण कुटुंबाने उभे केले होते. तिची मुले दीपा आणि चिकू यांना आधीच मकोका अंतर्गत अटक करण्यात आली आहे. तिचा भाऊ हरिओम आणि सहकारी रवी हे देखील या सिंडिकेटमध्ये सक्रिय होते. एका कॉर्पोरेट युनिटप्रमाणे हे कुटुंब अमली पदार्थांची विक्री आणि पुरवठा सांभाळत असे.
सुलतानपुरीतील पेडलर ते ड्रग्ज क्वीनचा प्रवास
कुसूमचा हा गुन्हेगारी प्रवास दिल्लीतील सुलतानपुरी भागातून सुरू झाला. सुरुवातीला ती छोट्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करायची. मात्र, हळूहळू तिने स्वतःचे जाळे इतके पसरवले की दिल्लीसह शेजारील राज्यांतही तिची दहशत निर्माण झाली. २००३ ते २०२४ या काळात तिच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत किमान ११ गुन्हे दाखल झाले आहेत. रोहिणी कोर्टाने तिला फरार घोषित केले होते. तिच्या अटकेमुळे दिल्ली आणि आसपासच्या भागातील अमली पदार्थाच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.