"त्या आईसमोर जाण्याची माझ्यात हिंमत नाही"; मुलाच्या कृत्यावर वडिलांचा पश्चात्ताप; लेक गमावलेल्या मातेचा माफीला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:09 IST2026-02-18T16:45:22+5:302026-02-18T17:09:24+5:30
दिल्लीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनी पीडित मुलाच्या आईची माफी मागितली.

"त्या आईसमोर जाण्याची माझ्यात हिंमत नाही"; मुलाच्या कृत्यावर वडिलांचा पश्चात्ताप; लेक गमावलेल्या मातेचा माफीला नकार
Delhi Hit and Run Case:दिल्लीतील द्वारका परिसरात एका अल्पवयीन मुलाने भरधाव स्कॉर्पियोने दिलेल्या धडकेत साहिल धनेश्रा या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. आता या प्रकरणात आरोपी मुलाच्या वडिलांनी पीडित आईची जाहीर माफी मागितली आहे. मात्र, पोटचा गोळा गमावलेल्या आईने ही माफी फेटाळून लावत विचारलेला प्रश्न सुन्न करणारा आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
"हात जोडून माफी मागतो"; वडिलांचा पश्चात्ताप
आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील नरेंद्र सिंह यांनी पीटीआयशी बोलताना आपली चूक मान्य केली. "माझ्या मुलाकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी वकिलांमार्फत पीडित कुटुंबाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या आईसमोर जाण्याची माझी हिंमत होत नाहीये," असे आरोपी मुलाच्या वडिलांनी म्हटलं.
"न्यायालय जो काही आदेश देईल, तो मला मान्य असेल, पण त्यांच्या दुःखाची भरपाई मी करू शकत नाही," अशा शब्दांत त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला.
माफीने माझा मुलगा परत येईल का? पीडित आईचा काळजाला भिडणारा प्रश्न
आरोपीच्या वडिलांच्या माफीवर साहिलची आई इन्ना माकन यांनी अत्यंत परखड आणि भावनिक प्रतिक्रिया दिली. "कुठल्या गोष्टीसाठी माफी? माझं आयुष्य संपवून टाकल्याबद्दल की हे प्रकरण आता मीडियात आलंय म्हणून? मला माफ करा, पण मी तुमची माफी स्वीकारू शकत नाही. जर हाच अपघात तुमच्या मुलासोबत झाला असता, तर तुम्ही माफी दिली असती का?" असा सवाल इन्ना माकन यांनी केला.
इन्ना माकन पुढे म्हणाल्या की, "आता माझ्यासाठी ना सकाळ उरली आहे ना संध्याकाळ. कामावर जाण्याचं कोणतंही कारण उरलं नाही की झोपेतून उठण्याचं. माझी संपूर्ण आयुष्यचं उद्ध्वस्त झालं, आता माफी मागून काय फायदा?"
नेमकं काय घडलं होतं?
३ फेब्रुवारी रोजी द्वारका परिसरात रील बनवण्याच्या नादात एका अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांची स्कॉर्पियो अत्यंत वेगात चालवून साहिल धनेश्रा याला धडक दिली होती. या धडकेत साहिलचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी आरोपीचे वडील व्यवसायानिमित्त कुशीनगरमध्ये होते. मुलाला गाडीची चावी देणे आणि त्याच्या स्टंटबाजीकडे दुर्लक्ष करणे या पालकांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे.