४० वर्षे 'तारीख पे तारीख'... ९० वर्षांच्या व्यक्तीला कोर्टाने सुनावली फक्त १ दिवसाची शिक्षा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:50 IST2025-07-11T12:50:16+5:302025-07-11T12:50:47+5:30

एक खटला तब्बल ४० वर्षे चालल्यानंतर न्यायालयाने ९० वर्षांच्या व्यक्तीला फक्त १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

delhi high court reduces sentence to one day in case dating back to 1984 for inordinate delay | ४० वर्षे 'तारीख पे तारीख'... ९० वर्षांच्या व्यक्तीला कोर्टाने सुनावली फक्त १ दिवसाची शिक्षा अन्...

४० वर्षे 'तारीख पे तारीख'... ९० वर्षांच्या व्यक्तीला कोर्टाने सुनावली फक्त १ दिवसाची शिक्षा अन्...

दिल्ली उच्च न्यायालयाशी संबंधित एका प्रकरणात खटला किती काळ सुरू राहू शकतो हे समोर आलं आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित एक खटला तब्बल ४० वर्षे चालल्यानंतर न्यायालयाने ९० वर्षांच्या व्यक्तीला फक्त १ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दोषी आता इतका म्हातारा झाला आहे की, त्याला अनेक गंभीर आरोग्य समस्यांनी ग्रासलं आहे. अशा परिस्थितीत दिल्ली उच्च न्यायालयाने दोषीला दिलासा देत त्याला अवघ्या एक दिवसाची शिक्षा सुनावली.

हा खटला ४० वर्षांपूर्वीच्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. या खटल्यावर भाष्य करताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं की, हा विलंब जलद सुनावणीच्या घटनात्मक अधिकाराच्या विरोधात आहे आणि यासह न्यायमूर्ती जसमीत सिंह यांनी आरोपीची शिक्षा कमी करून ती एका दिवसाची केली. हा खटला १९८४ मध्ये सीबीआयने नोंदवला होता. त्यावेळी दोषी व्यक्ती एक सरकारी कर्मचारी होता.

न्यायालयाने म्हटलं की, ही घटना ४ जानेवारी १९८४ रोजी घडली. तेव्हापासून न्यायालयीन कामकाज चार दशकांहून अधिक काळ चाललं. ट्रायल पूर्ण होण्यासाठी जवळजवळ १९ वर्षे लागली. त्यानंतर अपील २२ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित राहिलं. सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटलं की, आरोपीवर टांगती तलवार होती. गेल्या ४० वर्षांपासून त्याचं भविष्य अनिश्चित होतं. 

दंडासह ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा 

सुरेंद्र कुमार १९८३ मध्ये स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसटीसी) चे वरिष्ठ अधिकारी होते. १९८४ मध्ये एका फर्मच्या भागीदाराकडून १५,००० रुपयांची लाच मागितल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांची तात्काळ जामिनावर सुटका करण्यात आली. २००२ मध्ये त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची आणि १५,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 

१५,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप

या प्रकरणातील एफआयआरमध्ये असा आरोप आहे की, एसटीसीने १४० टन सुक्या माशांच्या पुरवठ्यासाठी कोटेशन मागवलं होतं. मुंबईतील एका फर्मने त्यांचं कोटेशन सादर केलं, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. असा आरोप आहे की, एका बैठकीत सुरेंद्र कुमार यांनी खासगी फर्मला आश्वासन दिलं की एसटीसी त्यांच्या फर्मकडून १४० टन सुक्या माशांसाठी ऑर्डर देईल, परंतु त्या बदल्यात १५,००० रुपयांची लाच मागितली. कुमार यांनी तक्रारदाराला दुसऱ्या दिवशी ७,५०० रुपये आणण्यास सांगितले, परंतु तक्रारदाराने सीबीआयकडे संपर्क साधला. सीबीआयने कुमार यांच्या घरावर छापा टाकला आणि अटक केली.

Web Title: delhi high court reduces sentence to one day in case dating back to 1984 for inordinate delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.