संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:52 IST2025-12-10T15:51:21+5:302025-12-10T15:52:28+5:30
रुग्णालय प्रशासनाने एका रुग्णाचा मृतदेह देण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांकडून बिलाची मोठी रक्कम मागितली.

संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
पंजाब जालंधरच्या लाजपत नगर परिसरात राम न्यूरो सेंटर रुग्णालयामध्ये रात्री उशीरा मोठा गोंधळ झाला. कारण रुग्णालय प्रशासनाने एका रुग्णाचा मृतदेह देण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांकडून बिलाची मोठी रक्कम मागितली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि लोकांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रमणदीप नावाचा एक तरुण गेल्या अनेक दिवसांपासून राम न्यूरो सेंटरमध्ये दाखल होता. कुटुंबियांच्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजल्यानंतर जेव्हा नातेवाईकांनी मृतदेह मागितला, तेव्हा रुग्णालयाने त्यांना हातात ४ लाख रुपयांचं बिल दिलं.
कुटुंबियांचं म्हणणं आहे की, त्यांना उपचाराच्या खर्चाबद्दल कोणतीही योग्य माहिती दिली गेली नाही आणि बिलाबद्दलही आधी काही सांगितलं नाही. मागितलेली रक्कम खूप जास्त होती, तसेच बिलामध्ये अनेक संशयास्पद एंट्रीज होत्या. रुग्णालय प्रशासनाने त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, जोपर्यंत बिलाची रक्कम भरली जाणार नाही, तोपर्यंत मृतदेह दिला जाणार नाही.
या घटनेची माहिती मिळताच रमणदीपचे मित्र, शेजारी आणि काही सामाजिक कार्यकर्ते तातडीने रुग्णालयात पोहोचले. बघता बघता रुग्णालयाच्या बाहेर आणि आत तणाव वाढला. सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाला एका सामान्य कुटुंबाला इतकं मोठं बिल कसं दिलं? असा सवाल विचारला. त्यांचं संभाषण लवकरच वादात बदललं आणि वातावरण तापलं. सुमारे अडीच तास रुग्णालयात हा गोंधळ आणि वादविवाद सुरू होता.
सतत वाढलेल्या दबावामुळे आणि वादामुळे अखेरीस रुग्णालय प्रशासनाला झुकावं लागलं. दीर्घकाळ चाललेल्या वादविवाद आणि मध्यस्थीनंतर ४ लाख रुपयांचं बिल ५०,००० रुपयांचं करण्यात आलं. हा तडजोडीचा करार होताच रुग्णालयाने रमणदीपचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. कुटुंबियांनी सांगितलं की, ते आधीच मृत्यूमुळे दु:खी होते, त्यात त्यांना भलंमोठं बिल देण्यात आलं.