लोणीकंदमध्ये कचऱ्यात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 17:28 IST2020-03-02T17:23:31+5:302020-03-02T17:28:07+5:30
महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वी कचऱ्यात आणून टाकला

लोणीकंदमध्ये कचऱ्यात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह
वाघोली : लोणीकंद-केसनंद रस्त्याच्या कडेला खंडोबामाळ परिसरातील कचऱ्यामध्ये ३५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी (दि.१) आढळला आहे. महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वी कचऱ्यात आणून टाकला असल्याने लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंदचे पोलीस पाटील बाळासाहेब कंद यांना लोणीकंद-केसनंद रस्त्याच्या कडेला खंडोबामाळ परीसरामध्ये पाण्याच्या टाकीच्या विरुद्ध बाजूकडील कागदाच्या कचऱ्यात अनोळखी वय अंदाजे ३0 ते ३५ वर्षाच्या महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ संबंधित बाब लोणीकंद पोलिसांना सांगितली. लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर महिलेच्या मृतदेहाचा पंचनामा केला. तीन ते चार दिवसांपासून मृतदेह कागदी कचऱ्यात पडून असल्याने उग्र वास येऊन मृतदेह कुजलेला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. पोलीस उपअधीक्षक सई भोरे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन खुनाचा उलगडा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर करीत आहेत.