खळबळजनक! बंद कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 19:08 IST2019-06-15T19:06:12+5:302019-06-15T19:08:38+5:30
गुदमरून मुत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.

खळबळजनक! बंद कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
मुंबई - विक्रोळी पार्कसाईट येथील वीर सावरकर मार्गावर गुरुवारी दरवाजे आणि खिडक्या बंद असलेल्या कारमध्ये वाहनचालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुरेश संभाजी डबरे (३७) (रहाणार - वर्षा नगर, विक्रोळी, पार्कसाईट) असे मृत चालकाचे नाव असून तो त्या गाडीचा मालक होता. ओला या खाजागी टॅक्सी कंपनीसाठी तो ही गाडी चालवीत असे. गाडीच्या काचा बंद करून झोपी गेल्याने त्याचा गुदमरून मुत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.
सुरेशची पत्नी आणि मुले पत्नीच्या माहेरी सुट्टीनिमित्त गेली होती. मंगळवारी त्याचे शेवटचे बोलणे त्याच्या नातेवाईकांशी फोनवर झाले होते. त्यानंतर गुरुवारी त्याची गाडी वीर सावरकर मार्गावर उभी असताना या गाडीमधून दुर्गंधी येत असल्याने काही नागरिकांनी गाडीत वाकून पाहिले असता त्यांना सुरेश मृत अवस्थेत गाडीत असल्याचे आढळले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली असता विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुजलेल्या अवस्थेत असललेला मृतदेह गाडीच्या काचा फोडून ताब्यात घेतला. हा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला असून मुत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावर समोर येईल. परंतु प्राथमिक दृष्ट्या गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज असल्याचे पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले.