Daytime tremors in the kopari; Fatal attack on family out of prejudice | कोपरीत भरदिवसा थरार; पूर्ववैमनस्यातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला

कोपरीत भरदिवसा थरार; पूर्ववैमनस्यातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला

ठळक मुद्देपोलीसांच्या निष्काळजीमुळे गुन्हेगाराला बळ मिळाल्याने त्यातूनच हा हल्ला घडल्याचा आरोप जखमींच्या कुटुंबीयांनी केला आहे.तिथे राहणाऱ्या रामदुलारी वैश्य कुटुंबाचे जवळच राहणाऱ्या प्रकाश अय्यर (श्रीनिवास) याच्यासोबत किरकोळ भांडण होते.

नवी मुंबई : जुन्या वादाचा बदल घेण्याच्या भावनेतून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना कोपरी येथे घडली आहे. यामध्ये तिघे भावंडे गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान पोलीसांच्या निष्काळजीमुळे गुन्हेगाराला बळ मिळाल्याने त्यातूनच हा हल्ला घडल्याचा आरोप जखमींच्या कुटुंबीयांनी केला आहे.

बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोपरी येथे हा थरार घडला. तिथे राहणाऱ्या रामदुलारी वैश्य कुटुंबाचे जवळच राहणाऱ्या प्रकाश अय्यर (श्रीनिवास) याच्यासोबत किरकोळ भांडण होते. काही दिवसांपूर्वी रामदुलारी यांची मुलगी काजल हिच्यासोबत देखील अय्यर याने किरकोळ कारणावरून भांडण केले होते. याप्रकरणी एपीएमसी पोलीसठाण्यात दोन्ही कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल आहे. मात्र अय्यर हा जाणीवपूर्वक भांडण काढत असल्याची तक्रार वैश्य कुटुंबाने एपीएमसी पोलीसांना दिली होती. त्यानंतरही पोलीसांकडून त्याच्या विरोधात ठोस कारवाई केली नव्हती. परिणामी अय्यर हा वैश्य कुटुंबाचा काटा काढण्याच्या उद्देशाने ४ ते ५ सहकाऱ्यांसह बुधवारी सकाळी दबा धरून बसला होता. यावेळी अमित वैश्य (२६) हा कामानिमित्ताने घराबाहेर निघाला असता सोसायटीतच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यावेळी त्याठिकाणी त्याची बहीण काजल (२७) व भाऊ हृतिक (१६) त्याठिकाणी आले असता त्यांच्यावर देखील वार करण्यात आले. यादरम्यान झालेल्या आरडा ओरडा मुळे तिथे जमाव जमलं असता मारेकरूनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर तिघाही जखमींना वाशीच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काजल व अमित यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तिघांच्याही गळ्यावर व पोटावर वार झाले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.


अटकेनंतरही धमकी 
हल्ल्याच्या घटनेनंतर अय्यर याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या रामदुलारी वैश्य यांना अय्यर याने "तू वाचला असून, तुला नंतर बघून घेतो" अशी धमकी दिली. त्यामुळे तिथला जमाव अधिकच भडकला होता.


पोलीस ठाण्याबाहेर आक्रोश
वैश्य कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात तिघे भावंडे गंभीर जखमी झाल्याचे समजताच त्यांच्या सुमारे २०० परिचितांनी एपीएमसी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. यावेळी जखमींच्या प्रकृतीवरून चिंता व्यक्त करत त्यांच्याकडून टाहो फोडला जात होता. तर मारेकरू प्रकाश अय्यर विरोधात अनेकदा तक्रार करूनही त्याला पोलीसांनी पाठीशी घातल्यानेच हा प्रसंग घडल्याचा आरोप रामदुलारी वैश्य यांनी केला आहे.

मारेकरू सराईत गुन्हेगार 
प्रकाश अय्यर हा सराईत गुन्हेगार असून सतत नशेत असतो. त्याला कोनी विरोध केल्यास सूड उगवण्याच्या भावनेतून तो हल्ला करतो किंवा खोट्या तक्रारी करत असतो. यापूर्वी त्याने स्वतःवर वार करून नितीन भोईर व नातेवाईकांवर खोटी तक्रार केली होती. यानंतरही अय्यर याच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

Web Title: Daytime tremors in the kopari; Fatal attack on family out of prejudice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.