'तुझ्या पोटात दुसऱ्याचे बाळ आहे'; गर्भवती पत्नीच्या 'लिव्ह-इन पार्टनर'ला भरदिवसा संपवले, पती फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:47 IST2025-12-11T16:47:57+5:302025-12-11T16:47:57+5:30
गुजरातमध्ये दिवसाढवळ्या क्रूर खून करण्यात आला असून गर्भवती पत्नीच्या लिव्ह-इन पार्टनरला विभक्त पतीने भोसकले.

'तुझ्या पोटात दुसऱ्याचे बाळ आहे'; गर्भवती पत्नीच्या 'लिव्ह-इन पार्टनर'ला भरदिवसा संपवले, पती फरार
Gujarat Crime:गुजरातच्या जामनगर शहरात बुधवारी भरदिवसा एका हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एका गर्भवती महिलेच्या विभक्त पतीने तिच्या लिव्ह-इन पार्टनरला वर्दळ असलेल्या बाजारात चाकूने भोसकून ठार केले आणि घटनास्थळावरून तो फरार झाला. दीर्घकाळ चाललेल्या वैवाहिक वादातून आणि संशयातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी सोनलबेन या पती दिलीपच्या वारंवार होणाऱ्या मारहाणीला आणि धमक्यांना कंटाळून विभक्त झाल्या होत्या. त्या घटस्फोटाच्या प्रयत्नात होत्या. दिलीप हा सोनलबेनवर दुसऱ्या कोणाचे तरी बाळ पोटात असल्याचा वारंवार आरोप करून छळ करत होता, असे सोनलबेन यांनी पोलिसांना सांगितले. या त्रासातून मुक्त होण्यासाठी सोनलबेन यांनी दिलीपला सोडले आणि मृत जितेंद्र चावडा यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केली होती.
बाजारात अडवून केले वार
बुधवारी सोनलबेन आपल्या लिव्ह-इन पार्टनर जितेंद्रसोबत प्रवास करत असताना पती दिलीप याने त्यांना रस्त्यात अडवले. त्याने जितेंद्रसोबत वाद घालायला सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला आणि दिलीप याने अचानक चाकू काढून जितेंद्रवर सलग चार ते पाच वार केले. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यानंतर आरोपी दिलीप तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जितेंद्र यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण दुर्दैवाने वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.
दुसऱ्या व्यक्तीचाही सहभाग
या भयंकर हल्ल्याच्या घटनेने सोनलबेन यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या साक्षीमध्ये त्यांनी पोलिसांना सांगितले की, दिलीपसोबत आणखी एक अनोळखी व्यक्ती होती, जिने या हल्ल्यात त्याला साथ दिली. जितेंद्र चावडा याचा मृतदेह जामनगर येथील जी.जी. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, फरार आरोपी दिलीप आणि त्याच्या साथीदाराचा माग काढण्यासाठी अनेक पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.