दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर गुडघेदुखीने हैराण; जिल्हा रुग्णालयात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 03:14 AM2019-06-08T03:14:02+5:302019-06-08T03:14:09+5:30

पुढील तपासणीसाठी जे.जे.मध्ये दाखल होण्याचा सल्ला

Dawood's brother, Iqbal Kaskar, kneeling; District Hospital treatment | दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर गुडघेदुखीने हैराण; जिल्हा रुग्णालयात उपचार

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर गुडघेदुखीने हैराण; जिल्हा रुग्णालयात उपचार

Next

ठाणे : मुंबईच्या बिल्डरकडून दोन कोटींची खंडणी, ठाण्यातील ज्वेलर्सकडून खंडणीपोटी दागिने आणि फलॅट घेतल्याप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केलेला गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर हा शुक्रवारी गुडघेदुखीची तक्रार करत जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. गुडघ्याला सूज आणि दातदुखीवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इक्बाल हा सध्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात मोक्कांतर्गत बंदिस्त आहे. त्याला रक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखी, पाय सुजणे, किडनी आदी आजारांनी पछाडले आहे. त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे आदेश अलीकडेच ठाणे न्यायालयाने दिले होते. त्याच्यावर एकामागून एक असे तीन खंडणीचे गुन्हे ठाण्याच्या ठाणेनगर आणि कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते. चौकशीत त्याचे दाऊदशी बोलणे झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करून ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवले. त्याची प्रकृती खालावली असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. त्यानंतर, रमजानच्या महिन्यात त्याला घरचे जेवण मिळण्यासाठीही न्यायालयात अर्ज केला होता.

ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने खंडणीप्रकरणी १८ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबईतील घरातून त्याला अटक केली होती. एकेकाळी भल्याभल्यांची हवा टाइट करणाऱ्या इक्बालला आता अनेक आजारांनी वेढले आहे. चालताना त्याचा पाय बधिर होत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार होत नसल्याने अ‍ॅड. इंगवले यांनी ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांच्याकडे योग्य वैद्यकीय उपचारासाठी सवलत मिळावी, म्हणून २७ मे रोजी अर्ज केला होता. त्यावर, १ जून रोजी निकाल दिल्याचे इंगवले यांनी सांगितले. त्याला मुंबईतील सर जे.जे. रुग्णालय, सेंट जॉर्ज रु ग्णालय आणि ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्याची मुभा दिली आहे.

इक्बालने गुडघेदुखीची आणि दातदुखीची तक्रार केली होती. त्याची शुक्रवारी अस्थिरोगतज्ञ्ज डॉ. प्रसाद भंडारी यांनी तपासणी केली. त्याचे सांधे सुजले असून रक्तदाब आणि इतरही आजार आहेत. त्यामुळे त्याच्यावर मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला ठाणे जिल्हा कारागृह प्रशासनाला दिला आहे. - कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे

Web Title: Dawood's brother, Iqbal Kaskar, kneeling; District Hospital treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.