२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 17:50 IST2025-10-21T17:49:51+5:302025-10-21T17:50:31+5:30
पोलिसांनी कसा घेतला शोध... वाचा सविस्तर

२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
सिद्दीपेट जिल्ह्यातील मीनाजीपेट गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. २० एकर जमिनीच्या लालसेपोटी एका मुलीने स्वतःच्या आईचा गळा घोटून खून केला. या भयंकर कटात तिचा पती आणि एक नातेवाईक देखील सहभागी होते. या तिघांनी तेलंगणापोलिसांनी चलाखीने पकडले. पोलिसांनी त्यांचा शोध कसा घेतला, ते समजून घ्या.
नेमकं काय घडलं?
५५ वर्षीय मनकानी बालमणी या पती चिन्ना बाला नरसय्या यांच्यासह राहत होत्या. त्यांना लावण्या आणि नवनीत अशा दोन मुली होत्या. बालमणीकडे एकूण २२ एकर शेती होती. त्यापैकी दोन एकर मोठ्या मुलीच्या नावावर होती. उर्वरित २० एकर दोन्ही मुलींमध्ये विभागण्याचा आईचा विचार होता. मात्र, धाकटी मुलगी नवनीतला हे मान्य नव्हते; तिला संपूर्ण जमीन स्वतःच्या नावावर हवी होती.
जमिनीच्या हव्यासातून गुन्हा
जमिनीच्या हव्यासापोटी नवनीतने आपला पती मधु आणि नातेवाईक रायनी गौरैया यांच्या मदतीने आईचा खून करण्याचा कट रचला. रात्रीच्या वेळी तिघांनी मिळून बालमणीचा गळा घोटून खून केला. त्यानंतर मृतदेह पिशवीत भरून रिक्षेत भरला. तितक्यात त्यांना कसलीतरी चाहुल लागली. पण त्यांनी वाट पाहिली आणि थोड्या वेळाने रिक्षा घेऊन निघून गेले. त्यांनी मृतदेह जवळच्या तलावात फेकून दिला. मृतदेहावरील चांदीचे कडे काढण्यासाठी नवनीतने आईचे पायही तोडून टाकले.
सत्य कसे बाहेर आले?
दुसऱ्या दिवशी साऱ्यांनी आई गायब झाल्याचा बनाव रचला. मात्र पोलिस तपासात मोबाइल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डमधून सत्य बाहेर आले. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.