दाभोलकर हत्याकांड : अॅड. संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 16:22 IST2019-07-05T16:19:10+5:302019-07-05T16:22:58+5:30
आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती.

दाभोलकर हत्याकांड : अॅड. संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर
पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अॅड. संजीव पुनाळेकर यांना विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी अटी शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. त्यांना 30 हजारांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती.
न्यायालयाच्या परवानगी शिवाय भारत सोडून न जाणे, पहिले तीन महिने सोमवार आणि गुरुवार सीबीआयच्या मुंबई येथील कार्यालयात उपस्थित राहणे व पुराव्यांशी छेडछाड न करण्याच्या अटीवर जामीन देण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना २६ मे रोजी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली मुंबई हायकोर्टाचे वकील आणि या हत्याकांडातील आरोपींची बाजू मांडणारे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली होती.
संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. संजीव पुनाळेकर हे दाभोळकर हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबाबातून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.