देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:52 IST2025-10-25T16:52:11+5:302025-10-25T16:52:39+5:30
Cyber Crimes: भारतामध्ये सायबर गुन्हेगार लोकांना लुटण्यासाठी नवे-नवे मार्ग शोधत आहेत.

देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
Cyber Crimes:भारतामध्ये सायबर गुन्हेगार आता लोकांना लुटण्यासाठी नवे-नवे मार्ग शोधत आहेत. अशाच पद्धतींपैकी एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट स्कॅम, ज्यात अल्पावधीत मोठा नफा देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली जाते. गृह मंत्रालयाच्या सायबर विंगने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत 30,000 हून अधिक लोक या स्कॅमचे बळी ठरले असून, एकूण ₹1,500 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
अशी होते फसवणूक
सायबर गुन्हेगार लोकांना ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट ग्रुप, ट्रेडिंग अॅप्स किंवा सोशल मीडिया लिंकद्वारे फसवतात. हे लोक “जलद नफा”, “हाय रिटर्न स्कीम” किंवा “क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट” अशा नावाखाली पैशांची मागणी करतात. एकदा पैसे पाठवले की, गुन्हेगार संपर्क तोडून गायब होतात.
अहवालात धक्कादायक आकडे
गृह मंत्रालयाच्या सायबर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 30,000+ लोक इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे शिकार झाले आहेत. याद्वारे ₹1,500 कोटींपेक्षा अधिक रक्कम लुटण्यात आली आहे. बंगळुरू, दिल्ली-NCR आणि हैदराबाद हे या फसवणुकीचे प्रमुख केंद्र ठरले आहेत. देशातील एकूण स्कॅम प्रकरणांपैकी 65% प्रकरणे या तीन शहरांतून आली आहेत. यातही बंगळुरुमध्ये सर्वाधिक फसवणूक झाली आहे.
कोण झाले सर्वाधिक बळी?
रिपोर्टनुसार, 30 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांवर सर्वाधिक हल्ले झाले, जे एकूण बळींपैकी 76% आहेत. हे लोक कामकाजी वयात असल्यामुळे डिजिटल गुंतवणुकीत सक्रिय असतात आणि त्यामुळे स्कॅमर्सचे प्रमुख लक्ष्य ठरतात. या स्कॅममध्ये प्रत्येक व्यक्तीला सरासरी ₹51.38 लाखांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी दिल्लीतील नागरिकांना सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे. सायबर गुन्हेगार या फसवणुकीसाठी सोशल मीडिया, पेमेंट अॅप्स, व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि बनावट वेबसाइट्सचा वापर करत आहेत.