केक कापून केला एक्स गर्लफ्रेंडवर हल्ला, ब्रेकअप नंतरची जवळीक पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 18:40 IST2022-03-04T18:39:42+5:302022-03-04T18:40:16+5:30
Attack on Ex-girlfriend : जन्मदिनाच्या पार्टीतला धक्कादायक प्रकार

केक कापून केला एक्स गर्लफ्रेंडवर हल्ला, ब्रेकअप नंतरची जवळीक पडली महागात
नवी मुंबई : ब्रेकअप नंतरही पूर्व प्रियकराला जन्मदिनाच्या पार्टीत निमंत्रण देणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने पूर्व प्रियसीचा जन्मदिवस केक कापून साजरा केल्यानंतर तिला मारहाण करून डोके फोडले आहे. याप्रकरणी त्या तरुणावर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सानपाडा येथील हॉटेल मध्ये हा प्रकार घडला आहे. वाशी परिसरात राहणारी तरुणी तिच्या मित्रांसोबत त्याठिकाणी जन्मदिनाची पार्टी करत होती. यावेळी तिच्या पूर्व प्रियकराने तिला फोन करून केक कापण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तिने त्यालाही हॉटेल मध्ये बोलवले होते. यानुसार तो केक घेऊन आला असता, केक कापल्यानंतर त्याने तरुणीसोबत वाद घालण्यास सुरवात केली. यातूनच त्याने हॉटेल मध्ये टेबलावर ठेवलेल्या काचेच्या वस्तू तिच्या डोक्यात मारून जखमी केले. यामध्ये ती जखमी होऊन डोक्यातून रक्त येऊ लागले असता त्याने तिथून पळ काढला.
संशयातून प्रेयसीला दगडाने ठेचणाऱ्या प्रियकराची प्रकृती ठणठणीत, घेतला होता गळा चिरून
या घटनेनंतर तरुणीने रुग्णालयात उपचार घेऊन बुधवारी सानपाडा पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार वैभव ठाकूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव व संबंधित तरुणी यांच्यात कॉलेज पासून मैत्री व नंतर प्रेम संबंध होते. परंतु त्याच्या भांडखोर स्वभावामुळे तिने त्याच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. यानंतरही तो तिला मारहाण करत असल्याने सहा महिन्यांपूर्वी त्याच्यावर वाशी पोलीस ठाण्यात दोन एनसी देखील दाखल आहेत. त्यानंतरही जन्मदिनाच्य दिवशी त्याने भेटण्याचा हट्ट केला असता, तिने त्याला पार्टीत बोलवल्याने हा प्रकार घडला.