गेन बिटकॉइनप्रकरणी २३ कोटींची क्रिप्टो करन्सी जप्त; ३४ लॅपटॉप, १२ मोबाइलही जप्त, सीबीआयची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 07:13 IST2025-02-27T07:12:58+5:302025-02-27T07:13:34+5:30
कंपनीच्या गेन बिटकॉइन या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना महिन्याकाठी १० टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष देणारी योजना कंपनीने २०१७ मध्ये राबवली होती.

गेन बिटकॉइनप्रकरणी २३ कोटींची क्रिप्टो करन्सी जप्त; ३४ लॅपटॉप, १२ मोबाइलही जप्त, सीबीआयची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तब्बल ६ हजार ६०६ कोटी रुपयांच्या गेन बिटकॉइनप्रकरणी सीबीआयने देशात ६० ठिकाणी केलेल्या छापेमारीदरम्यान २३ कोटी ९४ लाख रुपये मूल्याची क्रिप्टो करन्सी जप्त केली आहे. त्याचबरोबर आर्थिक व्यवहारांची १२१ कागदपत्रे, ३४ लॅपटॉप, हार्ड डिस्क, १२ मोबाइल, तसेच कंपनीच्या संचालकांमध्ये ई-मेलद्वारे झालेला संवाद आदी गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुंबई, पुणे, नांदेड, कोल्हापूर, दिल्ली, झाशी, हुबळी, मोहाली, अशा एकूण ६० ठिकाणी छापेमारी केली होती.
जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि ई-मेलची सध्या तपासणी सुरू आहे. हा घोटाळा नेमका कसा झाला आणि त्यातील पैशांची फिरवाफिरती कशी आणि कुठे झाली? तसेच परदेशात या पैशांद्वारे किती व्यवहार झाले? याचा उलगडा सीबीआय करणार आहे.
प्रकरण काय?
मे. व्हेरिएबल टेक प्रा.लि. ने या बिटकॉइन कंपनीची स्थापना २०१५ मध्ये झाली होती. अमित भारद्वाज (आता हयात नाही), अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेन्द्र भारद्वाज हे या कंपनीचे मुख्याधिकारी होते.
कंपनीच्या गेन बिटकॉइन या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना महिन्याकाठी १० टक्क्यांचा परतावा देण्याचे आमिष देणारी योजना कंपनीने २०१७ मध्ये राबवली होती.
देशातील हजारो गुंतवणूकदारांनी या आमिषाला बळी पड़त कंपनीच्या योजनेमध्ये गुंतवणूक केली होती. कंपनीच्या संचालकांनी देशभरातून गोळा झालेले ६ हजार ६०६ कोटी रुपये विविध मार्गानी स्वतःच्या खात्यामध्ये फिरवत गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
परदेशातही कारवाई
ईडीचे अधिकारीदेखील या प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत कंपनीची देशातील आणि परदेशातील १७२ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.