कोट्यवधीची रोकड, सोने, दागदागिने, अधिकाऱ्यांच्या घरावरील EDच्या धाडीत सापडले घबाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 13:42 IST2022-10-14T13:41:43+5:302022-10-14T13:42:11+5:30
ED Raid News: छत्तीसगडमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या घरामध्ये ईडीकडून घालण्यात आलेल्या धाडीमध्ये आतापर्यंत चार कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत

कोट्यवधीची रोकड, सोने, दागदागिने, अधिकाऱ्यांच्या घरावरील EDच्या धाडीत सापडले घबाड
रायपूर - छत्तीसगडमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या घरामध्ये ईडीकडून घालण्यात आलेल्या धाडीमध्ये आतापर्यंत चार कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. ईडीने ही कारवाई मंगळवारी सकाळपासून छत्तीसगडमधील रायपूर, बिलासपूर, दुर्ग, रायगड, कोरबा आणि महासमुंदसह २० ठिकाणी सुरू आहे. ईडीकडून ज्या अधिकाकाऱ्यांकडे ही कारवाई केली जात आहे, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे उपसचिव, जिल्हाधिकारी, एसपी, मायनिंग डायरेक्टर, कोळसा व्यापारी, काँग्रेस नेते आणि मद्य व्यावसायिक यांचा समावेश आहे. ही कारवाई राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीने मंगळवारपासून ही कारवाई सुरू केली होती. त्यानंतर ही कारवाई बुधवारीही सुरू होती. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली आहे. ईडीच्या कारवाईच्या फेऱ्यात सापडलेले अधिकारी हे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत. ईडीच्या रडारवर आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये आयएएस समीर बिश्नोई, रायगडचे कलेक्टर रानू साहू आणि त्यांचेय आयएएस पती जे.पी. मौर्य यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अधिकाऱ्यांसोबत मायनिंग ऑफिसर आणि काही आमदारही या कारवाईच्या तडाख्यात सापडले आहेत. या कारवाईमध्ये ईडीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी फौज कामाला लागली होती. त्यापूर्वी व्यापारी सूर्यकांत तिवारी यांच्या घरावरही आयटी आणि ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.