शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
By जितेंद्र कालेकर | Updated: October 3, 2025 09:47 IST2025-10-03T09:47:23+5:302025-10-03T09:47:47+5:30
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गेल्या दोन महिन्यांमध्ये एक कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गेल्या दोन महिन्यांमध्ये एक कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत हा गुन्हा घडला असून वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. अशा सायबर ठगांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तरीही या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनीही अशा अनोळखी लिंक आणि व्हॉट्सॲपग्रुपवरील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.
बॅंकेचा अधिकारी भासवून भामटेगिरी
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने वागळे इस्टेट येथील खासगी कंपनीतील अधिकारी उदय गहिने (४६) यांची सायबर भामट्यांनी १९ लाख २७ हजारांची फसवणूक केली. जुलै २०२५ मध्ये फेसबुक न्याहाळताना गहिने यांच्या मोबाइलवर शेअर मार्केटचे प्रशिक्षण घेण्याबाबत एक लिंक आली. त्यावरून त्यांना व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा मिळेल, असे आमिष बँक अधिकारी भासवणाऱ्या भामट्याने त्यांना दाखविले. योजनेला भुलल्यामुळे त्यांनी ३ ऑगस्ट २०२५ रोजी ५० हजारांचे पेमेंट पाठविले. दुसऱ्याच दिवशी गुंतवणुकीवर ४,५०० हजारांचा नफा झाल्याचे भासविले. नफा काढण्यासाठी त्यांना टॅक्स भरण्यास सांगितले. अशा प्रकारे १९ लाख २७ हजार ८६० गुंतविले. त्यावर ३९ लाख ४० हजारांचा फायदा दाखविला. प्रत्यक्ष रक्कम न मिळाल्याने त्यांनी २४ सप्टेंबर रोजी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
१२ लाख ८० हजारांची फसवणूक
अशाच गुंतवणुकीच्या प्रलोभनातून ठाण्यातील व्यावसायिक योगेश नायर (रा. वाघबीळ) या व्यावसायिकालाही १२ लाख ८० हजारांचा गंडा घातला. नायर यांना १९ ऑगस्ट २०२५ ते १६ सप्टेंबर २०२५ यादरम्यान व्हॉट्सॲपवर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याबद्दलची जाहिरात दिसली. त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांना ट्रेडिंग स्ट्रॅटेजिस ग्रुप १२ या ग्रुपवर सहभागी केले. खाते सुरू करण्यासाठी लिंक पाठवून त्यांच्याकडूनही रक्कम उकळण्यात आली. त्यांनीही २३ सप्टेंबर रोजी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार केली.
पाच हजारांमध्ये सात लाख लंपास
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याच्या नावाखाली ठाण्यातील २६ वर्षीय तरुणीला ७ लाख ३२ हजारांचा गंडा घातला. एका हॉटेलसाठी अभिप्राय देण्याच्या बहाण्याने तिच्या इन्स्टाग्राम आयडीवर जाहिराती आल्या. अंशकालीन नोकरीच्या आशेने तिने या जाहिरातीवर क्लिक केले. तिला पाच हजारांचा फायदा झाला. तिचीही अशीच फसवणूक झाल्याची तक्रार वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली.
व्हॉट्सॲपचा होतोय गैरवापर
व्हॉट्सॲपसारख्या प्लॅटफॉर्म्सचा वापर अशा फसवणुकीसाठी हमखास हाेताे. व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर मार्केटची माहिती देण्यात येते. स्टॉक मार्केटकडे वाढता कल हेरून स्कॅमर्स यूजर्सना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आमंत्रित करतात. नफ्याची बतावणी करून समभाग खरेदी करण्यासही सांगण्यात येते. मोफत गुंतवणुकीच्या स्किल्स शिकवणे, झिरो नुकसान अशा गोष्टींचे दावे हाेतात. मोठा नफा होण्याचा दावा केल्याने गुंतवणूकदारही रस घेतात. अगदी दहा दिवसांमध्ये ५० टक्के नफ्याबद्दलही मेसेज असतात. गुंतवणूकदारांनी अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये. अधिकृत सोर्सेसची पुष्टी करावी. अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा, असा सल्ला ठाणे सायबर पोलिसांनी दिला आहे.