म्हसरुळला सराईत गुन्हेगाराचा खून, जामिनावर होता बाहेर, दहा ते बारा गंभीर गुन्ह्यांत सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 22:59 IST2021-11-21T22:53:50+5:302021-11-21T22:59:08+5:30
Crime News: म्हसरुळ, पंचवटी परिसरात गुंडगिरी करत खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार प्रवीण गणपत काकड (२८,रा.गुलमोहर कॉलनी, म्हसरुळ) यास अज्ञात व्यक्तींनी धारधार शस्त्राने भोसकून ठार मारल्याची घटना घडली.

म्हसरुळला सराईत गुन्हेगाराचा खून, जामिनावर होता बाहेर, दहा ते बारा गंभीर गुन्ह्यांत सहभाग
नाशिक - म्हसरुळ, पंचवटी परिसरात गुंडगिरी करत खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार प्रवीण गणपत काकड (२८,रा.गुलमोहर कॉलनी, म्हसरुळ) यास अज्ञात व्यक्तींनी धारधार शस्त्राने भोसकून ठार मारल्याची घटना घडली. रविवारी (दि.२१) रात्री हा खून उघडकीस आला. घटनास्थळावर पोलिसांना एक ॲक्टीवा दुचाकी आढळून आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, प्रवीण काकड हा पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध म्हसरुळ पोलीस ठाण्यात दहा ते बारा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दिवाळीसाठी प्रवीण हा जामीनावर कारागृहातून बाहेर आला होता.
म्हसरुळ-आडगाव लिंकरोडवरील स्मशानभुमीच्यापुढे असलेल्या एका निर्जन मोकळ्या भुखंडावर प्रवीण काकडचा मृतदेह रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गवतामध्ये आढळून आला. घटनेची माहिती मिळताच म्हसरुळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेहाचा पंचनामा करत तत्काळ ओळख पटवून जिल्हा शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. रात्री उशीरापर्यंत प्रवीण याच्या मारेकऱ्याचा पोलिसांना शोध लागलेला नव्हता. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
ओली पार्टी करताना झाला असावा हल्ला
ज्या ठिकाणी प्रवीणचा मृतदेह गवतामध्ये आढळून आला तेथेच पोलिसांना मद्याच्या काही रिकाम्या बाटल्या तसेच मोपेड काळ्या रंगाची दुचाकी आढळून आली आहे. पोलिसांनी दुचाकी जप्त केली असून सुमारे दोन ते तीन संशयितांनी मिळून प्रवीणचा खून केला असल्याची श्यक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. ही दुचाकी प्रवीणने आणली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.