सराईत गुन्हेगार मोहम्मद रफिक एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 16:04 IST2019-11-14T16:00:46+5:302019-11-14T16:04:12+5:30
त्याच्यावर २०१६ साली प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

सराईत गुन्हेगार मोहम्मद रफिक एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध
मुंबई - सराईत गुन्हेगार मोहम्मद रफिक याला महाराष्ट्र धोकादायक प्रतिबंधक उपक्रम (एमपीडीए) कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दहशत पसरवून चोरी, जबरी चोरी, लूटपाट यासारखे गुन्हे करण्यात सराईत असलेल्या गुन्हेगार मोहम्मद रफिक असलम आजाद शेख उर्फ चावलला बुधवारी स्थानबद्ध केले.
मुंब्रा येथे राहणारा मोहम्मद रफिक (२२) त्याच्या साथीदारासह ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, मुलुंड, विद्याविहार, कुर्ला, घाटकोपर आणि भांडुप या रेल्वे स्थानकावर दहशत पसरवून अनेक वर्षांपासून गुन्हे करीत आहे. त्याच्यावर आतापर्यंत १७ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि ११ मालमत्तेविषयी आहेत. त्याच्यावर २०१६ साली प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
ठाणे या रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरीसारखा एक गंभीर गुन्हा केला. त्याच्या दहशतीमुळे सामान्य प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होत होता. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एमपीडीए कायद्याची कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी भविष्यात अशा कारवाई करण्यात येणार आहेत. या आधी गुन्हेगार सुरेश रामअवतार, दुसरी कारवाई झैनुल अब्बास शब्बीर राजन आणि तिसरी कारवाई मोहम्मद रफिक असलम आजाद शेख उर्फ चावल याच्यावर केली आहे.