आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 21:01 IST2019-09-21T21:00:39+5:302019-09-21T21:01:44+5:30
आरोपींनी वारंवार प्रत्यक्ष भेटून संगनमत करून मानसिक त्रास दिला...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा
पिंपरी : वारंवार प्रत्यक्ष भेटून संगनमत करून मानसिक त्रास दिला. तुझ्या बायकोचे लफडे आहे, तू कस काय लग्न केले, असे म्हणून एकाला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी दोघांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर दत्तू कांबळे असे फाशी घऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मयत ज्ञानेश्वरची आई सुरेखा दत्तू कांबळे (वय ४५, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय नंदकुमार घाडगे आणि बालाजी उर्फ सोन्या अशोक येडके (दोघेही रा. देवळाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घाडगे आणि येडके हे दोघेही ज्ञानेश्वर यांच्या पत्नीच्या गावातील आहेत. दोघाही आरोपींनी संगनमत करून वारंवार प्रत्यक्ष भेटून दारू पाजून तसेच फोन करून तुझ्या बायकोचे लफडे आहे, तू कस काय लग्न केले, असे म्हणून मानसिक त्रास दिला. ज्ञानेश्वर यांनी २९ जुलै रोजी त्यांच्या घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने फाशी घेतली. याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी आकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, २० सप्टेंबर रोजी मयत ज्ञानेश्वर यांच्या आईने पोलीस ठाण्यात येऊन आरोपी अजय आणि सोन्या यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे