दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:11 IST2025-11-01T15:10:46+5:302025-11-01T15:11:35+5:30
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या कीटकनाशक विक्रेता मनीष हत्याकांडाने आता एक धक्कादायक वळण घेतले आहे.

दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या कीटकनाशक विक्रेता मनीष हत्याकांडाने आता एक धक्कादायक वळण घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत आरोपी मित्र राजवीर आणि त्याचा साथीदार साहिल यांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी हत्येमागील जे कारण सांगितले, ते ऐकून पोलीसही स्तब्ध झाले.
पोलीस अधीक्षक एन.पी. सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटले की, खेड़ाभाऊ येथील रहिवासी मनीष (२८) याच्या हत्येची तक्रार गुरुवारी त्याच्या चुलत्याने झिंझाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी राजवीर आणि त्याचा साथीदार साहिल यांना अटक केली.
ब्लॅकमेलिंगमुळे रचला कट
अटकेतील आरोपींपैकी एकाने आपण समलैंगिक असल्याचे कबूल केले आहे. त्याची आणि मयत मनीषची जुनी ओळख होती. राजवीरचा मनीषच्या गावात नेहमी संपर्क असायचा आणि त्यांच्यात मैत्री होती.
नेमकं काय घडलं?
राजवीरची काही दिवसांपूर्वी साहिलसोबतही मैत्री झाली, ज्याची माहिती मनीषला होती. साहिल आणि राजवीर यांच्यात समलैंगिक संबंध असल्याचे मनीषला कळले होते. मनीषने या दोघांना धमकावण्यास सुरुवात केली. "मी तुम्हा दोघांचे समलैंगिक संबंध सगळ्यांना उघड करून सांगेन", असे तो सतत त्यांना म्हणत होता.
या ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त झालेल्या राजवीर आणि साहिलने मनीषला कायमचे संपवण्याचा कट रचला. गुरुवारी दोन्ही आरोपी बाईकवरून मनीषच्या घरी पोहोचले, पण मनीष तिथे नव्हता. मनीष त्यांना रामबीरच्या बागेत भेटायला गेला असता, त्याचा साहिलसोबत जोरदार वाद झाला. आधी ठरलेल्या योजनेनुसार, राजवीरने मनीषचे हात धरले आणि साहिलने मनीषच्या पोटात आणि छातीत चाकूने वार केले. चाकू लागून मनीष जागेवरच कोसळला. हत्येनंतर दोन्ही आरोपी बाईकवरून पळून गेले. या झटापटीत राजवीरच्या उजव्या हातालाही चाकू लागला होता.
५ मिनिटांत घरी पोहोचणार होता एकुलता एक मुलगा
दिवसाढवळ्या झालेल्या या चाकू हल्ल्यात मनीष गंभीर जखमी झाला होता. गावाजवळील रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत तो पडलेला आढळला. नातेवाईकांनी त्याला ऊन सीएचसी येथे नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पोट आणि छातीवर चाकूने भोसकल्याच्या दोन गंभीर जखमा होत्या. खेड़ाभाऊ गावात राहणारा मनीष आपल्या चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याच्या हत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृताच्या बहिणींची लग्ने झाली आहेत, तर मनीषचेही फक्त सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दुपारी मनीषची फोनवर कुटुंबाशी बोलणे झाले होते, तेव्हा त्याने 'मी पाच मिनिटांत घरी पोहोचतोय', असे सांगितले होते. पण तो घरी पोहोचलाच नाही.
मृताचे चुलते रूप सिंह यांनी सांगितले की, आरोपी राजवीर आणि त्यांच्या कुटुंबाचे मागील पाच वर्षांपासून चांगले संबंध होते. त्यांच्यात कोणताही वाद नव्हता. दोन-तीन दिवसांपूर्वी मनीषने घरी कोणाशी तरी वाद झाल्याचे सांगितले होते, पण त्यापुढे त्याने काहीच माहिती दिली नाही. मात्र, या जुन्या मैत्रीचा एवढा भयानक शेवट होईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती.