Crime News : कारागृहातून पलायन केलेला सराईत चोरटा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 20:53 IST2021-12-24T20:51:30+5:302021-12-24T20:53:00+5:30
Crime News : भिवंडी येथे राहणाऱ्या अविनाशने कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरल्याची घटना घडली होती.

Crime News : कारागृहातून पलायन केलेला सराईत चोरटा गजाआड
कल्याणः येथील आधारवाडी आणि पंढरपूर कारागृहातून पलायन केलेल्या आणि जबरी चोरीच्या गुन्हयातील अविनाश कैलास गायकवाड या अट्टल चोरटयाला महात्मा फुले चौक पोलिसांनी बुधवारी सापळा लावून रात्री अकरा वाजता कल्याण बस स्थानक परिसरातून अटक केली.
भिवंडी येथे राहणाऱ्या अविनाशने कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान आरोपी हा कल्याण बस स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना खब-यामार्फत मिळाली. त्यानुसार त्याला अटक करण्यासाठी सापळा रचला होता. अटक केल्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 5 मोबाइल जप्त केले. विशेष म्हणजे त्याच्यावर पैठण, परळी, वैजनाथ आणि पंढरपूर सह कल्याण परिमंडळातील महात्मा फुले चौक, खडकपाडा आणि रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून कल्याणातील आधारवाडी कारागृहासह पंढरपूर कारागृहातून देखील तो पळून गेला होता अशी माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी दिली.