Crime News: मंदिरावरील सोन्याच्या कळसाची चोरी, सोलापूरमध्ये बाप्पाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशीच प्रकार; भाविकांमध्ये संतापाची लाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 07:40 IST2022-09-01T07:39:47+5:302022-09-01T07:40:20+5:30
Crime News: सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या तळे हिप्परगा येथील प्राचीन मशरूम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस बुधवारी पहाटे चोरीला गेला. २८ तोळे सोन्याचा मुलामा दिलेला, २५ किलो वजनाचा हा कळस असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime News: मंदिरावरील सोन्याच्या कळसाची चोरी, सोलापूरमध्ये बाप्पाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशीच प्रकार; भाविकांमध्ये संतापाची लाट
सोलापूर : सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या तळे हिप्परगा येथील प्राचीन मशरूम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस बुधवारी पहाटे चोरीला गेला. २८ तोळे सोन्याचा मुलामा दिलेला, २५ किलो वजनाचा हा कळस असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा चोरट्यांनी हे धाडस केले आहे. मंगळवारी रात्री पुजाऱ्यांनी नित्य नियमित पूजा आटोपून मंदिर बंद केले. पुजारी संजय पतंगे पहाटे चारच्या सुमारास नित्यपूजेच्या निमित्ताने उठले. मंदिरात येण्यापूर्वीच सर्वप्रथम कळसाचं दर्शन घेण्याची त्यांची नेहमीची सवय होती. त्यानुसार पाहताच कळस चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून भादंवि ३७९ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सहा वर्षांपूर्वीही असाच प्रकार
- सहा वर्षांपूर्वी ६ जुलै २०१६ रोजी मंदिराचा कळस चोरीला जाण्याचा प्रकार घडला होता.
- तत्कालीन पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी तातडीने चक्रे फिरवून २४ तासांत तो कळस शोधून मंदिर व्यवस्थापनाच्या ताब्यात दिला होता. या कळसाची किंमत १४ लाख रुपये आहे.
सोलापुरातील मशरूम गणपती कळस चोरीला गेला आहे. डावीकडील छायाचित्र कळस दिसत आहे.