मांत्रिकाने स्मशानातून उकरून काढले 30 मुलांचे मृतदेह; करोडपती होण्यासाठी 11 वर्षीय मुलाचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 14:45 IST2022-02-14T14:33:47+5:302022-02-14T14:45:19+5:30
Crime News : आजही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. लोकांनी भूलवून, खोटी आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते. यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो.

मांत्रिकाने स्मशानातून उकरून काढले 30 मुलांचे मृतदेह; करोडपती होण्यासाठी 11 वर्षीय मुलाचा बळी
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अनेक भागात आजही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. लोकांना भूलवून, खोटी आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते. यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. काही दिवसांपूर्वी तंत्र-मंत्रामुळे त्रस्त मुलाने वडिलांची हत्या केली होती. ही घटना राजस्थानमधील दौसा येथील मेहंदीपूर बालाजी येथील आहे. तर दुसरीकडे राजसमंदमध्ये पालक 13 महिन्यांच्या आजारी बाळाला तांत्रिकाकडे घेऊन गेले.
मुलाच्या शरीरात केवळ 2 ग्रॅम रक्त शिल्लक होते. त्याची तब्येत अधिक बिघडली, यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने रक्त देऊन बाळाचा जीव वाचवला. यासारखी अनेक उदाहरणं राजस्थानमधून समोर आली आहेत. आजच्या प्रगत जगातही राजस्थानमधील काही भागात अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची मोठी फसवणूक केली जात आहे. विविध कारणांमुळे लोकं तंत्र-मंत्राची मदत घेतात. यात लगेच श्रीमंत होणं, मुलगा व्हावा म्हणून वा सूड उगवण्यासाठीही लोक मांत्रिकाकडे जातात.
करोडपती बनण्यासाठी 11 वर्षांच्या मुलाचा बळी
तांत्रिकांनी आपल्या कृत्यांमध्ये अनेक निरागस मुलांचा जीव घेतला. गंभीर आजारापासून सुटका मिळवण्यासाठी गरम सळीने मुलांना चटका दिला. करोडपती बनण्यासाठी 11 वर्षांच्या मुलाचा बळी दिला. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये दर वर्षी 200 हून अधिक अशी प्रकरणं येतात. तंत्र-मंत्रासाठी 50 हून अधिक लोकांना आपला जीव द्यावा लागतो. भीलवाड़ा, अलवर, चितोड़गड, करोली, बांसवाड़ा, डूंगरपूर ही ठिकाणं तांत्रिकांची असल्याचं मानलं जातं.
श्रीगंगानगरमधील एका स्मशानात एका लहान मुलीचा मृतदेह पुरला होता. कुटुंब दुसऱ्या दिवशी स्मशानात आलं तर मुलीचा मृतदेह तेथे नव्हता. तर शेजारी दारूच्या बाटल्या, लाल कापड, भांडी दिसली. या घटनेनंतर तपास सुरू केला. यावेळी असं आढळलं की, अशा प्रकारे 30 मुलांचे मृतदेह उकरून काढण्यात आले होते. हाती लागलेल्या पुराव्यानुसार हे कृत्य मांत्रिकाचं असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.