भयंकर! 'तिने' लग्नाचा प्रस्ताव नाकारला, संतापलेल्या तरुणाने तिचा जीव घेतला अन् केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 16:28 IST2021-12-02T16:26:48+5:302021-12-02T16:28:46+5:30
Crime News : एका शिक्षकाने एकतर्फी प्रेमातून आपल्या विद्यार्थिनीची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

भयंकर! 'तिने' लग्नाचा प्रस्ताव नाकारला, संतापलेल्या तरुणाने तिचा जीव घेतला अन् केलं असं काही...
नवी दिल्ली - झारखंडमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका शिक्षकाने एकतर्फी प्रेमातून आपल्या विद्यार्थिनीची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही विद्यार्थिनी नात्याने तरुणाची भाची लागत होती. तसेच तिची हत्या केल्यानंतर त्याने स्वत: देखील आत्महत्या केली आहे. शिक्षकाने गोळ्या झाडून विद्यार्थिनीची हत्या केली. यानंतर ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिला. कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाचं विद्यार्थिनीवर खूप प्रेम होतं. त्याने लग्नासाठी देखील तिला विचारलं होतं. पण तिने लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळेच संतापाच्या भरात तरुणाने तिचा जीवच घेतला. या घटनेने दोघांचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकही हैराण झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अनेकांची चौकशी करत आहेत. इम्तियाज अन्सारी असं या तरुणाचं नाव आहे. झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील खरौंधी पोलीस स्टेशन हद्दीतील करीवाडीह गावात हा भयंकर प्रकार घडला.
विद्यार्थिनीची हत्या करून स्वत: केली आत्महत्या
एका तरुणाने प्रेम प्रकरणातून विद्यार्थिनीची गोळ्या झाडून हत्या केली. संबंधित विद्यार्थिनी नात्याने त्याची भाची होती. गुन्हा केल्यानंतर आरोपी इम्तियाज अन्सारी फरार झाला. रेल्वे फाटकाजवळ सुसाईड नोट लिहून त्याने मालगाडीजवळ उडी मारून आत्महत्या केली. मालगाडीजवळ उडी मारल्यामुळे तरुणाचे दोन्ही पाय कापले गेले. तर त्याच्या शरीरावरही अनेक ठिकाणी जखमा आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांना सापडली सुसाईड नोट
तरुणाच्या मृतदेहापासून काही अंतरावर पोलिसांनी एक सुसाईड नोट देखील सापडली. त्यावर त्याने स्वतःचं, वडील-भावाचं नाव, घरचा पत्ता लिहून ठेवला होता. आणि आपला मृतदेह या पत्त्यावर पाठवण्याची विनंती केली. पोलिसांनी कुटुंबीयांना बोलावून मृतदेहाची ओळख पटवली. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.