भयानक! नेव्हीच्या अधिकाऱ्याने केली प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; फ्रीजमध्ये लपवले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:58 IST2026-03-30T12:58:25+5:302026-03-30T12:58:57+5:30
Navy Employee Killed Girlfriend : विशाखापट्टणमच्या गजुवाका पोलीस ठाण्यात एका नेव्ही कर्मचाऱ्याने हत्येची कबुली दिली आहे. विवाहित रवींद्रने प्रेयसी मोनिकाची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये लपवला होता.

भयानक! नेव्हीच्या अधिकाऱ्याने केली प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; फ्रीजमध्ये लपवले...
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरात श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती करणारी एक अतिशय भयानक घटना समोर आली आहे. नौदलात तंत्रज्ञ असलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह भाजीसारखे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
आरोपी आणि पीडिता गेल्या काही काळापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि संतापाच्या भरात आरोपीने प्रेयसीचा गळा दाबून खून केला. मात्र, इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने तिचे शरीर अनेक तुकड्यांमध्ये कापले.
आरोपीने पीडितेचे धड आणि शरीराचे इतर भाग एका मोठ्या फ्रीजमध्ये लपवून ठेवले जेणेकरून दुर्गंधी पसरू नये. ओळख पटू नये म्हणून त्याने प्रेयसीचे शिर (डोकं) कापून ते जाळून टाकले. धक्कादायक म्हणजे, या कृत्यानंतर तो सामान्यपणे वावरत होता, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याला बेड्या ठोकल्या.
भारतीय नौदलात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या २९ वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. जर रवींद्र स्वतःहून गजुवाका पोलीस ठाण्यात पोहोचला नसता, तर या भीषण कृत्याचा उलगडा कदाचित कधीच झाला नसता. मूळचा विजयनगरम जिल्ह्याचा रहिवासी असलेला रवींद्र हा विशाखापट्टणममध्ये नौदलात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. रवींद्र विवाहित होता, मात्र त्याचे २९ वर्षीय मोनिका नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. रवींद्रची पत्नी काही आठवड्यांपूर्वी आपल्या माहेरी गेली होती, ज्याचा फायदा घेत त्याने मोनिकाला घरी बोलावले.
पोलिस तपास सुरू
रवींद्रने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्या घरी धाव घेतली. तिथे फ्रीजमध्ये मोनिकाच्या मृतदेहाचे अवयव सापडल्याने पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून आरोपी रवींद्रला अटक करण्यात आली आहे.