Crime News: हातावरील टॅटूमुळे खुनाचा उलगडा, दोघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:09 IST2022-08-30T13:09:02+5:302022-08-30T13:09:26+5:30
Crime News: कॅम्प नंबर ५ दसरा मैदान येथील शिवसेना शाखेच्या बाजूला नालेसफाईचे काम सुरू असताना २४ ऑगस्टला सकाळी नाल्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता.

Crime News: हातावरील टॅटूमुळे खुनाचा उलगडा, दोघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक
उल्हासनगर : कॅम्प नंबर ५ दसरा मैदान येथील शिवसेना शाखेच्या बाजूला नालेसफाईचे काम सुरू असताना २४ ऑगस्टला सकाळी नाल्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता. या प्रकरणात मृतदेहाच्या हातावरील नावाच्या टॅटूवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
मृतदेह आढळल्यावर सफाई कामगारांनी ही माहिती हिललाईन पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालय त्यानंतर जे. जे. रुग्णालयात नेला. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित ढेरे यांनी तपास केला. मृतदेहाच्या हातावर दीपक नावाचे टॅटू काढला होता. नावाच्या टॅटूवरून तपास केल्यावर मृृताचे नाव दीपक भट आहे.
एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरू
खून झालेला दीपक भट याचा काही दिवसांपूर्वी समीर थापा आणि कृष्णा थापा यांच्यासोबत वाद झाला होता. १४ ऑगस्टला ते दारू पिण्यासाठी जमले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. समीर, कृष्णा यांनी दीपकच्या डोक्यात फावड्याने मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी किसन थापा याला अटक केली असून, समीर थापा याचा शोध पोलीस घेत आहेत.