कर्नाटकातील एका युवकाने आपल्याच प्रियसीची धक्कादायक पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले आहे. पण, ही घटना त्या तरुणाच्या एका चुकीमुळे उघडकीस आली. आरोपी तरुणाने गोव्यात आपल्या प्रेयसीची चाकूने हत्या केली आणि तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. त्यानंतर पोलिस तपासादरम्यान मृत मुलीची पर्स सापडली, यामध्ये बसचे तिकीट होते. या पुराव्याच्या आधारे पोलिस आरोपी तरुणापर्यंत पोहोचले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २२ वर्षीय आरोपी संजय केविन एम याने त्याची प्रेयसी रोशनी मोशे एमची हत्या केली आहे. संजय आणि रोशनी हे बंगळुरू दक्षिणचे रहिवासी आहेत. दोघेही ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही लग्न करण्यासाठी गोव्यात आले होते. दोघांमध्ये कशावरून तरी वाद झाला होता, रागाच्या भरात संजयने रोशनीचा गळा चिरून खून केला.
बस तिकिटावरून प्रकरण उघडकीस आले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयने प्रताप नगरच्या जंगलात मृतदेह फेकून दिला होता. मृतदेहाची माहिती १७ जून रोजी सकाळी मिळाली. तपासादरम्यान पोलिसांना रोशनीची पर्स सापडली. पर्समध्ये हुबळी (कर्नाटक) ते गोवा असे बसचे तिकीट होते. कर्नाटक पोलिसांच्या मदतीने आरोपी संजयला हुबळी येथून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने रोशनीला घेऊन बसने गोव्यात आल्याची कबुली दिली.
आरोपीने पोलिसांना सांगितले की, बसमध्येच दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर ते पिलीम-धारबांदोरा येथे उतरले. संजयने रोशनीला जंगलात नेले, चाकूने तिची हत्या केली आणि पळून गेला.