नवरी जोमात, नवरदेव कोमात! अवघ्या 7 दिवसांचं लग्न, संबंधांना नकार; दागिने घेऊन नववधू पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 13:06 IST2022-05-13T13:04:49+5:302022-05-13T13:06:00+5:30
Crime News : तीन लाख रोख, दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन ती फरार झाली आहे.

नवरी जोमात, नवरदेव कोमात! अवघ्या 7 दिवसांचं लग्न, संबंधांना नकार; दागिने घेऊन नववधू पसार
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर आठवड्याभरातच नववधू पैसे आणि दागिने घेऊन फरार झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तीन लाख रोख, दोन सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र आणि घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन ती फरार झाली आहे. यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलीस लुटारू वधू आणि तिच्या टोळीचा शोध घेत आहेत. यानंतर नवरदेवाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणीसह दलालांविरुद्ध फसवणूक आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे सर्वजण फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या बाणगंगा पोलीस ठाणे हद्दीतील रेवती रेंजमधील रहिवासी विजया पडना यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा राहुलची ओळख काजल उर्फ ज्योती आणि राधेश्याम यांच्याशी झाली होती. हे लोक दलालांच्या मदतीने लग्न लावायचे. या टोळीने आपल्या मुलाला जाळ्यात अडकवलं. यानंतर पोलिसांनी विजया पडना यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
राहुल आणि ललिता यांचे लग्न 10 जुलैला झाले होते. ललिता ही विधवा आहे, असे सांगून तिचे लग्न लावून देण्यात आले होते. लग्नाआधी छत्तीसगडच्या भिलाईमध्ये लग्नाआधी साखरपुडा आणि इतर विधी पार पडले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वधूने मासिक पाळीचे कारण देऊन शारीरिक संबंधाला नकार दिला. मात्र, यानंतर फक्त सात दिवसातच ती तरुणी फरार झाली. यानंतर नवरदेवाच्या कुटुंबाने दलालाकडे धाव घेतली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी छत्तीसगड येथेही एक टीम पाठवली आहे. ही एक मोठी टोळी असून त्यात अनेक लोक सामील असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.