"आता सहन होत नाही..."; पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, सुसाईड नोटने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 19:29 IST2022-05-16T19:28:45+5:302022-05-16T19:29:40+5:30
Crime News : पत्नीच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

"आता सहन होत नाही..."; पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, सुसाईड नोटने खळबळ
नवी दिल्ली - बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नालंदा जिल्ह्यातील लाहिरी पोलीस स्टेशन हद्दीतील रामचंद्रपूर टीचर्स कॉलनीमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. चंद्रदेव कुमार असं व्यक्तीचं नाव आहे. चंद्रदेवच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्याकडून एक सुसाईड नोट जप्त केली आहे, ज्यामध्ये त्याने पत्नीचे दुसऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे. यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते.
वाद व छळाला कंटाळून चंद्रदेवने टोकाचं पाऊल उचललं. पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस अधिकारी सुबोध कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रदेवने गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीने त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत. चंद्रदेव जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्येही त्याने याचा उल्लेख केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
चंद्रदेवने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, पत्नी तिच्या वर्गमित्रासह गेल्या शुक्रवारी घरातून पळून गेली. त्यानंतर तिने कोर्टात जाऊन लग्न केलं. त्यामुळे आता सहन होत नाही. चंद्रदेव रामचंद्रपूर बाजार समितीत बटाटे व कांद्याची विक्री करायचा. 2015 मध्ये छबीलापूर पोलीस ठाणे हद्दीतील वाढी गावात त्याचं लग्न झालं. लग्नानंतर दोन मुलं झाली. एक 6 वर्षांची मुलगी आणि 4 वर्षांचा मुलगा आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.