Crime News: शॉकींग! घरातील सोफासेटमध्येच तिचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:22 IST2022-02-16T16:20:31+5:302022-02-16T16:22:16+5:30
Crime News: सुप्रिया किशोर शिंदे अस हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात शिंदे कुटुंबीय राहतं. सुप्रिया ही घरात एकटीच होती

Crime News: शॉकींग! घरातील सोफासेटमध्येच तिचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ
कल्याण-डोंबिवली : डोंबिवली नजीक असलेल्या दावडी परिसरात एक धक्कादायक घडली आहे. एका महिलेची हत्या करून तिचा मृतदेह तिच्याच घरातील सोफा सेटमध्ये कोंबून ठेवण्यात आला. गळा दाबून या महिलेला मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, तिच्याच घरात हत्या करून तेथील सोफा सेटमध्ये मृतदेह कोंबण्याचा धक्कादायक प्रकार कोणी केला? ही बाब शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखक करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
सुप्रिया किशोर शिंदे अस हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात शिंदे कुटुंबीय राहतं. सुप्रिया ही घरात एकटीच होती. तिचा मुलगाही शाळेत गेला होता. सुप्रिया ही शाळेत आपल्या मुलाला घ्यायला गेली नसल्यानं फोनाफोनी सुरु झाली. शेजाऱ्यांकडे ठेवण्यात आलेल्या चावीनं दरवाजा उघडण्यात आला. मात्र, सुप्रिया आढळून आली नाही. दरम्यान तिचे पती किशोर शिंदे हे सुद्धा संध्याकाळी उशिरा घरी पोहचले. मात्र, पत्नीचा काही ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, शिंदे यांच्या घरात नातेवाईक आणि शेजारी जमले . त्यांना सोफा सेटमध्ये काहीतरी संशयास्पद वाटले. सोफ्याची तपासणी केली असता यात सुप्रियाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन हादरली. सध्या काही लोकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं समजतं आहे.