सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहातून तरुणीची हत्या; पोलिसांनी जळत्या चितेवरून ताब्यात घेतला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 18:58 IST2021-12-01T18:56:09+5:302021-12-01T18:58:24+5:30

Crime News : नाराज झालेल्या घरच्या मंडळींनी तरुणीची निर्घृण हत्या केली आहे. कुटुंबीयांनी हत्या करून तिचा मृतदेह हा गुपचूप जाळण्याचा प्रयत्न केला.

Crime News fatehabad alleged honour killing family tried to cremate the body | सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहातून तरुणीची हत्या; पोलिसांनी जळत्या चितेवरून ताब्यात घेतला मृतदेह

सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहातून तरुणीची हत्या; पोलिसांनी जळत्या चितेवरून ताब्यात घेतला मृतदेह

नवी दिल्ली - हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. तरुणीने कुटुंबीयांच्या मनाविरोधात आपल्या मर्जीने गावातील एका तरुणासोबत प्रेमविवाह केल्याने एक धक्कादायक घटना घडली आहे. नाराज झालेल्या घरच्या मंडळींनी तरुणीची निर्घृण हत्या केली आहे. कुटुंबीयांनी हत्या करून तिचा मृतदेह हा गुपचूप जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र या भयंकर प्रकाराची माहिती पोलिसांनी मिळाली आणि ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जळत्या चितेवरून मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

तरुणीच्या पतीने पत्नीचे वडील महेंद्र, आई, काका आणि इतर दोन नातेवाईकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेह जाळल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फतेहाबादमध्ये राहणाऱ्या अनुप आणि शिक्षा यांचं एकमेकांवर प्रेम होतं. गेल्या वर्षी त्यांनी कल्पना न देता प्रेमविवाह केला होता. मात्र त्यानंतर करिअर सेट होईपर्यंत आपापल्या घरी राहण्याचा निर्णय़ घेतला होता. नुकतीच शिक्षाला चंदीगडमध्ये नोकरी लागली होती. 

मुलीला धडा शिकवण्यासाठी रचला भयंकर कट 

अनुपही काही दिवसांनी चंदिगडला गेला आणि दोघं एकत्र राहू लागले. तीन दिवसांपूर्वीच शिक्षाच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी शिक्षाला धडा शिकवण्यासाठी भयंकर कट रचला. तिच्याशी गोड बोलून तिला घरी येण्यास सांगितलं. शिक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असून तिचं आपण थाटामाटात लग्न लावून देऊ, असं सांगत तिच्या कुटुंबीयानी तिला घरी बोलावलं. मात्र घरी आल्याच्या दोन दिवसांनंतर तिची हत्या करण्यात आला आणि तिचा मृतदेह गुपचूप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

अंत्यसंस्कार करून पुरावे मिटवून टाकण्याचा होता कुटुंबीयांचा डाव 

तरुणीवर अंत्यसंस्कार करून सर्व पुरावे मिटवून टाकण्याचा तिच्या कुटुंबीयांचा डाव होता. मात्र अनुपला या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. त्याने पोलिसांना फोन केला आणि घटनेची कल्पना दिली. पोलिसांनी फायर ब्रिगेडसह स्मशानात प्रवेश करत पेटती चिता विझवली आणि मृतदेह ताब्यात घेतला. अचानक आलेले पोलीस पाहून कुटुंबीय घाबरले. जळत्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: Crime News fatehabad alleged honour killing family tried to cremate the body