क्रूरतेचा कळस! मुलींची हत्या करणारा सीरियल किलर; 2 वर्षांत चौघींचा घेतला जीव, 'असा' रचत होता कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 14:48 IST2022-01-12T14:36:54+5:302022-01-12T14:48:55+5:30
Crime News : 22 वर्षीय मुलीची हत्या झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याआधी आरोपीने तीन अल्पवयीन मुलींची हत्या केली आहे.

फोटो - आजतक
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मुलींची हत्या करणाऱ्या सीरियल किलरने दोन वर्षांत चार जणींचा जीव घेतला आहे. फरीदाबादमध्ये 22 वर्षीय मुलीची हत्या झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याआधी आरोपीने तीन अल्पवयीन मुलींची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलींची छेड काढायचा. मुलींनी त्याला विरोध केला असता रागाच्या भरात तो त्यांचा जीव घ्यायचा.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. यातून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची देखील शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सीरियल किलर असून तो 1986 पासून हत्या करत आहे. सिंहराज असं या 54 वर्षीय आरोपीचं नाव असून तो सध्या सिटी हॉस्पिटल येथे गार्डची नोकरी करत होता. आरोपीने 31 डिसेंबर रोजी आपल्या एका ओळखीच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने याआधी केलेल्या भयंकर गुन्ह्यांची दिली कबुली
मुलीने आरोपीला विरोध केला असता त्याने गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर आरोपी तिचा फोन घेऊन फरार झाला होता. पोलीस तेव्हापासून त्याचा शोध घेत होते. काही पुरावे हाती लागल्यानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने याआधी केलेल्या भयंकर गुन्ह्यांची कबुली दिली. हे ऐकून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काका आणि त्याच्या मुलाची केली होती हत्या
पोलिसांनी सांगितलं की, 31 डिसेंबर रोजी मुलीची हत्या करण्याआधी देखील आरोपीने काही लोकांची हत्या केली आहे. सिंहराजने 1986 मध्ये आपला काका आणि त्याच्या मुलाची हत्या केली होती. त्यानंतर त्याला अटक देखील झाली होती. 2019 मध्ये चहाची टपरी चालवणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीची देखील छेड काढली होती. तिने विरोध केला असता तिची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला होता. ऑगस्ट 2020 मध्ये देखील एका मुलीची हत्या केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.