'बाबांनीच आईला लटकवलं...', 7 वर्षीय लेकाने सांगितलं नेमकं काय घडलं?; पतीने केली पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:52 IST2022-02-03T15:50:30+5:302022-02-03T15:52:01+5:30
Crime News : पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा पदार्फाश झाला.

'बाबांनीच आईला लटकवलं...', 7 वर्षीय लेकाने सांगितलं नेमकं काय घडलं?; पतीने केली पत्नीची हत्या
नवी दिल्ली - हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. बल्लभगड जिल्ह्यातील चावला कॉलनीमध्ये पतीने 7 वर्षांच्या एका निष्पाप मुलासमोरच आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून तुरुंगात टाकलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पतीचे इतर कोणत्यातरी महिलेसोबत संबंध सुरू होते. या संबंधांचा पत्नी सतत विरोध करत होती. पत्नीच्या या विरोधामुळे संतप्त झालेल्या पतीने अखेर टोकाचं पाऊल उचललं. ओढणीने गळा आवळून तिची राहत्या घरामध्ये हत्या केली. एवढंच नाही तर या प्रकरणाला आत्महत्येचं नाव द्यावं म्हणून आरोपी पतीने तिचा मृतदेह हा घराच्या खिडकीला लटकवला.
"आई-वडिलांचं भांडण मुलाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं"
हा संपूर्ण धक्कादायक प्रकार हा घरामध्ये असलेल्या सात वर्षांच्या लेकाने पाहिला. त्यावेळी कोण कोण घरी हजर होते आणि आई-वडिलांचं भांडण त्या मुलाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. पोलिसांनी याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. त्यामुळे पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा पदार्फाश झाला.
"आईचा मृतदेह खिडकीच्या ग्रीलला लटकवण्यात आला"
सध्या पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात 7 वर्षीय मुलानं सांगितलं की, त्याच्या वडिलांनी आईचा ओढणीनं गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आईचा मृतदेह खिडकीच्या ग्रीलला लटकवण्यात आला. आरोपी पतीला अटक करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.