बाबो! मंडपाच्या ऐवजी रुग्णालयात पोहोचली नववधू; लग्नात DJ वरून जोरदार राडा, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 16:02 IST2022-05-16T15:56:25+5:302022-05-16T16:02:12+5:30
Crime News : नवादामध्ये लग्नात डीजे लावावा यासाठी नववधू आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

फोटो - आजतक
नवी दिल्ली - सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. याच दरम्यान बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवादामध्ये लग्नात डीजे लावावा यासाठी नववधू आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. गावातील काही लोक लग्नात जबरदस्तीने डीजे लावण्याची मागणी करत होते. सिरदला पोलीस ठाण्याच्या परिसरातील बेलदरिया गावात हा भयंकर प्रकार समोर आला आहे. घरामध्ये आनंदाचं वातावरण असताना, लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच नवरीसह तिच्या कुटुंबीयाना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
बेदम मारहाणीत नवरी गंभीररित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. काही लोकांनी डीजे लावावा या मागणीसाठी नववधूच्या घराची तोडफोड केली. तसेच नातेवाईकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता सर्वांना मारहाण करण्यात आली. उपचारासाठी सर्व कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नववधूचे काका गणेश चौहान यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.
"उमेश चौहान, रामबालक चौहान, कमलेश चौहान, कुलदीप चौहानसह काही लोक आमच्या घरी आले आणि त्यांनी लग्नात डीजे वाजवणं महत्त्वाचं आहे असं म्हटलं. आम्ही जमीन विकून आमच्या मुलीचं लग्न करत आहोत. डीजेची व्यवस्था करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगून देखील डीजे ट्रॉली घेऊन ते आमच्या दारात आले आणि पैसे मागू लागले" अशी माहिती नववधूच्या काकांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. रिपोर्टनुसार राधे चौहान यांची मुलगी संगीता कुमारीचं लग्न ठरलं होतं. मुलाकडची मंडळी वरात घेऊन गावात येत होती. पण रस्त्यात त्यांना मुलीच्या कुटुंबीयांना झालेल्या मारहाणीची माहिती मिळताच ते घाबरून पळून गेले. या घटनेने नववधूच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.