नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्येभाजपाच्या एका माजी मंत्र्याची (BJP) हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. आत्माराम तोमर (Atmaram Tomar) असं हत्या झालेल्या भाजपाच्या माजी मंत्र्याचं नाव आहे. मंत्र्याची टॉवेलने गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. ही हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
आत्माराम तोमर यांची उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. निवासस्थानी तोमर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तोमर यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तोमर यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तोमर यांना 1997 साली भाजपानं मंत्रिपद दिलं होतं. तसेच ते जनता वैदिक कॉलेजचे मुख्य प्राध्यापक देखील राहिले आहेत.
संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्माराम तोमर यांचा चालक सकाळी निवासस्थानी पोहोचला होता. यावेळी दरवाजा बंद होता. त्याने वारंवार दरवाजा ठोठावूनही दरवाजा उघडला नाही तेव्हा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी आत्माराम तोमर यांचा मृतदेह जमिनीवर होता. त्यांच्या गळ्याभोवती टॉवेल गुंडाळलेला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. प्राथमिकदृष्ट्या आत्माराम तोमर यांची टॉवेलच्या सहाय्याने गळा दाबून हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.