संतापजनक! भाजपाच्या आणखी एका नेत्याची गुंडगिरी, निवृत्त सैनिकाला मारहाण, सलूनची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 16:00 IST2022-08-10T15:54:36+5:302022-08-10T16:00:05+5:30
Crime News : भाजपाच्या युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ऋतुराज चतुर्वेदी यांच्या दादागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

फोटो - TV9 hindi
मध्य प्रदेशातील रीवामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. भाजपाच्या युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ऋतुराज चतुर्वेदी यांच्या दादागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चतुर्वेदी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सलून चालवणाऱ्याला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर मारहाणीसोबतच त्यांनी दुकानातील महत्त्वाच्या सामानाचीही तोडफोड केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अमहिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या द बार्बर शॉप सलूनचे संचालक आणि युवा नेता यांच्यात काही कारणांवरून जुना वाद होता. त्यामुळे रविवारी ऋतुराज चतुर्वेदी आणि त्यांच्या साथीदारांनी दुकान गाठले आणि दुकान संचालक असलेले निवृत्त सैनिक दिनेश मिश्रा यांच्यासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा धक्कादायक प्रकार हा दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून मारहाणीमागचं नेमकं कारण अद्यप स्पष्ट झालेलं नाही. जुन्या वादावरून ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. भरदिवसा दुकानात घुसून मारहाण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या दुकान मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.