Crime News: ४ वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 20:57 IST2022-05-20T20:57:24+5:302022-05-20T20:57:55+5:30
Crime News: दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून एकाची हत्या करून गेली ४ वर्ष फरार असलेल्या आरोपीला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे.

Crime News: ४ वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
मीरारोड - दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून एकाची हत्या करून गेली ४ वर्ष फरार असलेल्या आरोपीला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे.
८ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या रात्री ८ च्या सुमारास चालक रामलाल पटेल (३७) हे त्यांची गाडी पार्किंग मध्ये उभी करून घरी जात होते. घरी जात असताना नालासोपारा च्या संतोष भुवन, गौराई पाडा नाका येथील अजय जयस्वाल यांचे भंगार दुकानालगत असलेल्या गल्लीत सचिन सुनील उपाध्याय याने दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून मनात राग धरुन पटेल यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने फटका मारला. डोक्यास गंभीर दुखापत होवून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु असताना पटेल यांचा मृत्यू झाला होता.
मयताची पत्नी उर्वशा पटेल यांच्या फिर्यादी नंतर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सचिन उपाध्याय हा मागील ४ वर्षापासून फरार होता. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील, सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे निरीक्षक अविराज कुराडे, सपोनि पुष्पराज सुर्वे सह संदिप शिंदे, किशोर वाडीले, पुषेंद्र थापा, अविनाश गर्जे, विकास राजपुत, सुमीत जाधव यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास चालू केला होता.
बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन उपाध्याय यास पकडण्यासाठी पोलीस पथक उत्तर प्रदेश च्या वाराणसी येथे गेले होते. वाराणसी येथे स्थानिक एस. टी. एफ. यांची मदत घेवून सलग सात दिवस शोधमोहीम राबवत उपाध्याय रा. स्वारीपुर, पो. प्रमकापुर, मछली शहर , जौनपुर ह्याला शुक्रवारी पकडण्यात आले आहे.