सव्वा लाखाची लाच मगितल्याप्रकरणी नाशिकमध्ये तलाठ्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 22:55 IST2021-02-03T22:55:39+5:302021-02-03T22:55:46+5:30
पथकाने घोळवे यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

सव्वा लाखाची लाच मगितल्याप्रकरणी नाशिकमध्ये तलाठ्याविरुद्ध गुन्हा
नाशिक : जमिनीची कागदपत्रे व सनद नावावर करुन देण्यासाठी आगरटाकळी येथील तलाठ्याने सुमारे सव्वा लाख रुपयांची मागणी करत तडजोडीत लाचेची दोन टप्प्यात रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित तलाठी किशोर संजयकुमार घोळवे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आगरटाळीजवळील खोडदेनगर येथील तक्रारदार यांच्या जागेची सनद व अन्य कागदपत्रे नावावर करुन देण्याच्या मोबदल्यात संशयित आगर टाकळी येथील घोळवे यांनी फिर्यादी तक्रारदार यांच्याकडे सुमारे सव्वा लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोड अंती दोन टप्प्यात रकम देण्याचे निश्चित झाले असता त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
यानुसार पथकाने लाचेच्या मागणीची सत्यता तपासणीसाठी सापळापूर्व पडताळणी केली असता यामध्ये फिर्यादी यांच्याकडून तडजोडीत 50 हजार व 75 हजार अशी रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे पथकाने घोळवे यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.