क्रिकेट सट्ट्यातील आराेपी पुणे पोलिसांच्या तावडीतून पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 21:18 IST2022-07-01T21:17:39+5:302022-07-01T21:18:00+5:30
Cricket Betting : किनवट येथून केली होती अटक, यवतमाळातील हॉटेलमध्ये होता मुक्काम

क्रिकेट सट्ट्यातील आराेपी पुणे पोलिसांच्या तावडीतून पसार
यवतमाळ : पुणे पोलिसांनी क्रिकेट सट्ट्याच्या गुन्ह्याचा तपास केला. यात नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील आरोपीचा सहभाग असल्याचे आढळून आले. त्या आरोपीला घेवून पुणे पोलीस यवतमाळात आले. येथे एका हॉटेलमध्ये पोलिसांनी आरोपीसह मुक्काम केला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आरोपी पसार झाला.
रामदेव मोहनलाल शर्मा (४३) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे क्राईम ब्रॅंचच्या युनिट ४ पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख गुन्ह्याच्या तपासात आले होते. त्यांनी किनवट येथून रामदेव शर्मा याला अटक केली. यवतमाळातही क्रिकेट सट्ट्याच्या अनुषंगाने काही आरोपी असल्याची माहिती होती. याचा शोध घेण्यासाठी रामदेवला घेवून पुणे पोलीस पथक यवतमाळात मुक्कामी थांबले. त्यांनी दारव्हा मार्गावरील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला.
शुक्रवारी पहाटे आरोपी रामदेव शर्मा हा पसार झाला. हा प्रकार लक्षात येताच पुणे पोलिसांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले. त्यांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी एपीआय देशमुख यांच्या तक्रारीवरून पसार झालेल्या रामदेव शर्माविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.