सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 07:08 IST2025-07-25T07:07:16+5:302025-07-25T07:08:06+5:30
सवतीचे तिसऱ्या मजल्यावरील घर बळकावण्यासाठी एका महिलेने चक्क क्रेनच्या साहाय्याने बाल्कनीतून साथीदारांसह घरात घुसून सवत आणि तिच्या नातलगांना मारहाण केली.

सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
मीरा रोड : सवतीचे तिसऱ्या मजल्यावरील घर बळकावण्यासाठी एका महिलेने चक्क क्रेनच्या साहाय्याने बाल्कनीतून साथीदारांसह घरात घुसून सवत आणि तिच्या नातलगांना मारहाण केली. त्यांना हुसकावून लावत घराचा ताबा घेतला. याप्रकरणी काशीगाव पोलिसांनी गुरुवारी क्रेन चालकासह तिघांना अटक करून क्रेन जप्त केली आहे.
नूरजहान ऊर्फ रोशनी सर्जील खान (वय ३७) अपना घर फेज २मधील तिसऱ्या माळ्यावर दिव्यांग मुलगी, मुलगा आणि आई-वडील, मावशीसह राहतात. तिचा पती सर्जील याने दुसरे लग्न शीतल सुरेश चौहान (३५) हिच्याशी केले. सर्जीलने पहिल्या पत्नीस म्हणजे रोशनी यांच्या नावे घर करून दिले आहे. मात्र, या घरावर शीतल यादेखील सातत्याने दावा करत होत्या. त्यांनी अनेकदा घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून त्यांच्यात भांडणेही होत असत.
२३ जुलैला शीतल आपली बहीण पूजा, तिचा मावस भाऊ, त्याचे दोन साथीदार आणि तीन अनोळखी महिलांसह क्रेन घेऊन सोसायटीच्या आवारात आल्या. क्रेनच्या साहाय्याने ते सर्व तिसऱ्या मजल्याच्या घराच्या बाल्कनीत उतरून घरात शिरले. शीतलने रोशनी यांच्या छातीवर बसून गळ्याला चाकू लावला. चाकू रोशनी यांच्या डोळ्याला लागला, तसेच त्यांच्या मुलीचा गळा पकडून तिला धक्का दिला, तर आई-वडील, मावशी यांनाही मारहाण करत सर्वांना घरातून हुसकावून लावून घराचा बळजबरीने ताबा घेतला.
आरोपी शीतलसह साथीदारांचा शोध सुरू
काशीगाव पोलिसांनी गुरुवारी क्रेनचालक यादवसह तीन जणांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी शीतल आणि तिचे अन्य साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले आहे. सुरक्षारक्षक असताना आणि आजूबाजूला लोक राहत असताना साथीदारांसह क्रेन घेऊन घरात घुसण्याच्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.